esakal | ‘खानदेश कन्या’ करणार माहेरवासियांचा मार्ग सुकर; शहादा- सुरत मार्गावर विशेष बस
sakal

बोलून बातमी शोधा

parivahan bus

गुजरात राज्यात खानदेशातील नंदुरबार, धुळे व लगतच्या जळगाव जिल्ह्यातील माहेर असलेल्या अनेक मुली, महिला आपल्या कुटुंबासह गुजरात राज्यातील सुरत, बारडोली, व्यारा, उधना या भागात अनेक वर्षापासून स्थायिक झाल्या आहेत.

‘खानदेश कन्या’ करणार माहेरवासियांचा मार्ग सुकर; शहादा- सुरत मार्गावर विशेष बस

sakal_logo
By
कमलेश पटेल

शहादा (नंदुरबार) : येथील राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने शहादा सुरत ‘खानदेश कन्या’ ही विशेष बस सुरु करण्यात आली आहे. परिसरातील बहुतांश मुली लग्नानंतर गुजरात राज्यात नोकरीनिमित्त स्थायिक झाल्या आहेत. या महिला व मुलींना माहेरी गावाकडे येण्यासाठीचा मार्ग सुकर व्हावा यासाठी विशेष बस सुरू करण्यात आल्याची माहिती शहादाचे आगारप्रमुख योगेश लिंगायत यांनी दिली. 
गुजरात राज्यात खानदेशातील नंदुरबार, धुळे व लगतच्या जळगाव जिल्ह्यातील माहेर असलेल्या अनेक मुली, महिला आपल्या कुटुंबासह गुजरात राज्यातील सुरत, बारडोली, व्यारा, उधना या भागात अनेक वर्षापासून स्थायिक झाल्या आहेत. लग्न सोहळा, दुःखद निधन, जावुळ, दिवाळी, दसरा, अक्षय तृतीया, आदी सण-उत्सवांसह अनेक कार्यक्रमांना महिलांची कुटुंबासह आवर्जून उपस्थिती असते. गेल्या वर्षभरापासून कोविड-१९ मुळे रेल्वे बंद आहेत. सुरत, भुसावळ, नंदुरबार, उधना यासह सर्व थांबा असलेल्या रेल्वे वर्षभरापासून रेल्वे रुळावर धावत नसल्याने गुजरात राज्यातून खानदेशकडे येण्यासाठी प्रवासी वर्गांना खूपच अडचण व आर्थिक झळ पोहोचत असते. 

रेल्‍वे बंद; बस ठरणार पर्याय
सध्या रेल्वे सुरू असलेल्या रेल्वे ह्या एक्स्‍प्रेस असल्यामुळे त्यांचे रिझर्वेशन करणे हे सामान्य नागरिकांना अवघड होत असते. अगोदरच खानदेशातील गेलेले अनेक कुटुंब हे हातावर मोलमजुरी करणारे आहे रेल्वेचा प्रवास सुकर व कमी खर्चाचा आहे. मात्र रेल्वे रूळावर नियमित केव्हा धावनार असा प्रश्न उपस्थित होत आहे. पॅसेंजर, लोकल रेल्वे रुळावर धावत नसल्याने प्रवासी वर्गांची मोठी अडचण ठरत आहे. अशावेळी शहादा आगाराने गुजरात राज्यातील सुरत, उधना, व्यारा, बारडोली या परिसरातून येण्यासाठी मार्ग सुकर व्हावा याकरिता विशेष ‘खानदेश कन्या’ बस सुरू करण्यात आल्या आहेत. 

अशी असेल बसची वेळ 
शहादा आगारातून शहादा- सुरत ही बस प्रकाशा, नंदुरबार, नवापूर, व्यारा ,बारडोली मार्गे सुरत उधना येथे जाण्याकरिता सकाळी साडेसातला पहिली बस, त्यानंतर सकाळी साडेदहाला व दुपारी एक वाजून ४५ मिनिटांनी अशा तीन बसेस सोडण्यात येत आहे. तसेच सुरतहून शहादाकडे येण्याकरिता सुरत येथून पहाटे चारला, पाचला, व सायंकाळी पाचला बसेस सुटण्याच्या वेळा देण्यात आल्या आहेत. शहादा आगाराकडून खानदेशातील व इतर प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मध्ये प्रवास सुकर, सुरक्षित व्हावा यासाठी या बसेस सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती आगार प्रमुख श्री लिंगायत यांनी दिली. याच सोबत शहादा ते खेतिया येथे सकाळी ८:३० वाजता विशेष बस सोडण्यात येत आहे. ही बस शहादा, म्हसावद, लक्कडकोट ,अंबापुर होत खेतिया येथे पोहोचणार आहे. या बस सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील सर्व प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image