२६ जानेवारीला किलो मांजरोवर तिरंगा फडकणार; गिर्यारोहक अनिल वसावेंना तीन लाखांची मदत  

धनराज माळी
Monday, 4 January 2021

घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना या मोहिमेसाठी आफ्रिकेला जाणे अशक्य वाटू लागले. त्यामुळे त्यांचे गिर्यारोहक बनण्याचे स्वप्न भंगणार होते.

नंदुरबार : आफ्रीका खंडातील सर्वोच्च अशा किलोमांजारो शिखरावर येत्या २६ जानेवारीला तिरंगा फडकावण्यासाठी जाणाऱ्या गिर्यारोहकांच्या पथकात निवड झालेल्या बालाघाट (ता. अक्कलकुवा) येथील अनिल वसावे यांचा खर्चाचा प्रश्‍न सुटला आहे. आदिवासी विकास मंत्र्यांनी ‘सकाळ’मधील वृत्ताची दखल घेत वसावे यांना आदिवासी विकास विभागातर्फे तीन लाखाचा धनादेश सोमवारी (ता. ४) प्रदान केला. त्यामुळे अनिल आता आदिवासी समाजातील पहिला गिर्यारोहक ठरणार आहेत. त्यांचे स्वप्नही पूर्ण होणार असल्याने त्यांनी ‘सकाळ’चे आभार मानले आहेत. 
३६० एक्सप्लोअरच्या वतीने येत्या २० ते २६ जानेवारी या काळात ‘किलो मांजारो’वर चढाई केली जाणार आहे. एव्हरेस्ट वीर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आनंद बनसोडे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या चढाईसाठी विविध स्पर्धांमधून १० गिर्यारोहकांची निवड करण्यात आली आहे. या टिममध्ये बालाघाट येथील अनिल यांची निवड झाली आहे. 

स्‍वप्न भंगणार होते पण..
घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना या मोहिमेसाठी आफ्रिकेला जाणे अशक्य वाटू लागले. त्यामुळे त्यांचे गिर्यारोहक बनण्याचे स्वप्न भंगणार होते. ही बाब त्यांनी ‘सकाळ’च्या कार्यालयात येऊन कथन केली. त्यानंतर ही वस्तुस्थिती ‘सकाळ’ने वृत्ताच्या माध्यमातून २० डिसेंबरला मांडली होती. त्या वृत्ताची दखल घेत अनेक संस्था, संघटनांनी अनिल यांना मदतीची आश्‍वासने दिली. एवढेच नव्हे तर, थेट आदिवासी विकास मंत्र्यांनी त्याची दखल घेत आदिवासी विकास विभागातून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार मंत्री अॅड. पाडवी यांनी आदिवासी विकास विभागाच्या न्युक्लीअस बजेट अंतर्गत तत्काळ कार्यवाही करुन विशेष मंजुरीने तीन लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. 

धनादेश प्रदान
या निधीचा प्रतीकात्मक धनादेश मंत्र्यांच्या हस्ते आज अनिल यांना प्रदान करण्यात आला. या वेळी त्यांच्या आई-वडिलांसह जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, प्रकल्प अधिकारी अविशांत पांडा, वसुमना पंत आदी अधिकारी उपस्थित होते. आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखराला गवसणी घालत हा सर्व चमु येत्या प्रजासत्ताक दिनी (ता. २६) आपला तिंरगा या शिखरावर फडकवणार आहे. त्यात आपल्या भागातील युवकाचा समावेश असल्याने त्याचा सर्वोच्च अभिमान असेल, असे मंत्री अॅड. पाडवी यांनी या वेळी सांगितले. 
 
‘सकाळ’मुळे स्वप्नपूर्ती होणार 
गिर्यारोहक अनिल वसावे यांनी कार्यक्रमानंतर मनोगत व्यक्त करताना ‘सकाळ’चा आवर्जून उल्लेख केला. ‘सकाळ माध्यम समूहा’ने मदतीसाठी आवाहन केले. ‘सकाळ’मुळेच माझे स्वप्न पूर्ण होणार असल्याची भावना व्यक्त करीत त्यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे आभार मानले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news south africa kilomanjaro mount anil vasave help padvi