शिक्षीका होण्याचे स्‍वप्न राहिले अपुर्ण; तरीही ती गाव साक्षर करण्यासाठी झटतेय

anganwadi teacher
anganwadi teacher

नंदुरबार : स्वप्न पाहण्यातच आयुष्य घालविणारे किंवा ते पूर्ण न झाल्याच्या वेदना घेऊन जगणाऱ्यांकडून चांगले काम होऊ शकत नाही. उलट स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी धडपड करणारे आपल्या कामातून समाधान मिळवू शकतात, हे रेवानगरच्या सुनीता पावरा यांनी सिद्ध केले आहे. शिक्षिका होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नसले तरी गावातील मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी सतत नवे उपक्रम राबविण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत. 
मुळच्या धडगावच्या असलेल्या सुनीताताईंनी लग्नानंतर अंगणवाडीसेविका म्हणून काम करण्यास सुरवात केली. शिक्षण केवळ बारावीपर्यंत झाल्याने त्यांना इच्छा असूनही शिक्षिका होता आले नाही. बालकांना शिकविण्याचे समाधान मिळावे म्हणून त्यांनी अंगणवाडी सेविकेचे काम स्वीकारले. अंगणवाडीची इमारत सुंदर असावी, अशी त्यांची इच्छा होती. ग्रामपंचायतीकडून मिळणारा निधी पुरेसा नसल्याने त्यांनी लोकसहभागातून इमारतीला सजविले. आतादेखील प्रवेशद्वारासाठी त्यांनी पाच हजार रुपये गोळा केले असून, २५ हजारांचा निधी उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बालकांचे पूर्व शिक्षण चांगले झाल्यास पाया मजबूत होत असल्याने त्यांनी अंगणवाडीतच नवे शैक्षणिक उपक्रम राबविले. टाकाऊ वस्तूपासून शैक्षणिक साहित्य तयार करून खेळणी, मॉडेल, खेळ, चित्रे, विविध वस्तूंच्या सहाय्याने मुलांना इथे शिक्षण दिले जाते. त्यामुळे अंगणवाडीत येणारी मुले उत्साहाने वावरताना आणि चटकन प्रतिसाद देताना दिसतात. नव्या वस्तू तयार केल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद उत्साह देणारा असल्याचे त्या सांगतात. 

स्‍वतःच्या पद्धती विकसीत केल्‍या
डिजिटल अंगणवाडीच्या माध्यमातून त्यांनी सहज शिक्षणाची पद्धत अनुसरली आहे. त्यामुळे बालगोपाळ अंगणवाडीत रमतात आणि आनंदी दिसतात. शिक्षण आणि व्यायाम यांचा समन्वय साधण्यासाठी त्यांनी स्वत:च्या पद्धती विकसित केल्या आहेत. त्यामुळेच लहान मुलांसोबत वाघोबाचे गाणे म्हणताना आणि मूल होऊन नाचताना आपल्या कामात रममाण होताना दिसतात. आपली अंगणवाडी सुंदर करण्यासेाबत परसात भाजीपाला लावण्याची त्यांची इच्छा आहे. बालकांना निसर्गात रममाण होता यावे आणि पौष्टिक अन्न मिळावे, यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. आदर्श शिक्षिका होण्यासाठी शाळेतील नोकरीच असावी लागते, असे नाही तर शिकणारा आणि शिकविणाऱ्यात विश्वासाचे-स्नेहाचे नाते निर्माण होणे गरजेचे असते. सुनीताताईंच्या अंगणवाडीत हेच पाहायला मिळत असल्याने तेथील मुले नक्कीच पुढे चांगले शिक्षण घेतील, असे जाणकार सांगतात. 
 
कुपोषण दूर करण्यातही यश 
गावातील कुपोषण दूर करण्यातही त्यांना चांगले यश आले आहे. १९ कुपोषित बालकांच्या प्रकृतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. खासगी डॉक्टरांकडून उपचाराचा आग्रह धरून एका कमी वजनाच्या मुलीचे प्राणही वाचविले. महिलांना पाककृती करून दाखविणे, आहाराची माहिती देणे, घरातील पाककृती अंगणवाडीत आणण्यास सांगणे व त्यात सुधारणा सुचविणे आदी उपक्रम कुपोषण कमी करण्यात उपयुक्त ठरले आहेत. 
 
गावाची सरपंच होऊन शिक्षणाला महत्त्वाचे स्थान मिळवून द्यायचे आहे. गावातील प्रत्येक मुला-मुलीने चांगले शिक्षण घ्यायला हवे आणि त्यासाठी इमारत आणि परिसरही सुंदर हवा. आपल्या परीने जे शक्य आहे ते निश्चित करीन. 
- सुनीता पावरा, अंगणवाडीसेविका 
 
मुलगी जन्माला आल्यानंतर तिचे वजन केवळ १ किलो होते. गुलशनताईंनी त्वरित रुग्णालयात दाखल करण्याचा आग्रह धरल्याने तिची प्रकृती वेळेत सुधारली. ताईंकडून आरोग्याची सर्व माहिती मिळते. 
- चिमणा पावरा, ग्रामस्थ 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com