esakal | ‘या’ झोपडीत घडले बरेच काही; पथकाने भेट देत लावले सील
sakal

बोलून बातमी शोधा

fraud doctor

‘या’ झोपडीत घडले बरेच काही; पथकाने भेट देत लावले सील

sakal_logo
By
सम्राट महाजन

तळोदा (नंदुरबार) : मालदा (ता. तळोदा) येथे संशयित बोगस डॉक्टर व्यवसाय करीत असून भोळ्या भाबड्या गरीबांची आर्थिक लूट करीत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्‍यानुसार आज पथकाने तेथे भेट दिली असता तो बोगस डॉक्टर आधीच तेथून पसार झाला. सदर पथकाने तो डॉक्टर राहत असलेल्या झोपडीला सील केले. मात्र तालुक्यात असे अनेक बोगस डॉक्टर बिनदास्तपणे व्यवसाय करीत गरिबांना लुटत आहेत. त्यांच्यावर कधी कारवाई करण्यात येईल असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

तळोदा तालुक्यातील अनेक लहान मोठ्या गावांमध्ये शासनाची मान्यताप्राप्त पदवी नसताना अथवा कोणतीही पदवी नसताना बोगस डॉक्टर बिनधास्तपणे व्यवसाय करीत आहेत. दरम्यान ते गरीब आदिवासी बांधवांची मोठ्या प्रमाणावर लुबाडणूक करीत आहेत. अनेकदा उपचारादरम्यान गरीब आदिवासी बांधवांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. याबाबत आमदार राजेश पाडवी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. त्यात त्यांनी ग्रामीण भागात कोरोना वाढीस बोगस डॉक्टर कारणीभूत ठरत असून जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या बोगस डॉक्टरांची चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच मालदा येथील गोपी पावरा यांनी देखील याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली होती.

अन्‌ तो डॉक्‍टर पसार

तालुका वैद्यकीय अधिकारी महेंद्र चव्हाण, बोरदच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा शिंदे, डॉक्टर पंकज पावरा, सहाय्यक गटविकास अधिकारी आर. बी. सोनवणे व पोलीस कर्मचारी ठाकरे यांचे पथक आज सोमवारी (ता. 19)मालदा (ता. तळोदा) येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या त्या संशयित बोगस डॉक्टराच्या चौकशीसाठी गेले होते. मात्र पथक पोहचण्याआधीच तो संशयित बोगस डॉक्टर तेथून पसार झाला होता. त्यामुळे सदर पथकाला रिकामे हाती परतावे लागले. सदर पथकाने तो झोलाछाप डॉक्टर राहत असलेल्या झोपडीला सील केले आहे.

बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी

तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात असंख्य बोगस डॉक्टर असल्याचे बोलले जाते. हे बोगस डॉक्टर स्वत: जवळील औषध व सलाईन लावून भोळ्या भाबड्या गरीबांची फसवणूक करीत आहेत. या बोगस डॉक्टरांच्या उपचारामुळे याआधी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी अपेक्षा ग्रामीण भागातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

मालदा येथे एक बोगस डॉक्टर व्यवसाय करीत असल्याची तक्रार होती, त्यानुसार त्याठिकाणी गेलो असतो, संबंधित डॉक्टर आधीच तेथून पसार झाला होता. तालुक्यात इतर ठिकाणी कोणी बोगस डॉक्टर आपला व्यवसाय करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

- डॉ. महेंद्र चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी

संपादन- राजेश सोनवणे