esakal | भाजपमधील गटबाजी, मतभेद टोकाला; तळोदा पालिकेचे चित्र 
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

तीन वर्षांपासून लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या नेतृत्वात शहराचा गाडा हाकला जात आहे. यादरम्यान सत्ताधारी भाजपच्या गोटात लहान- मोठे वाद उद्भवत होते, मात्र कधी सामंजस्याने समन्वय साधून तर कधी वरिष्ठांनी यात लक्ष घालीत ते वाद वेळीच रोखले.

भाजपमधील गटबाजी, मतभेद टोकाला; तळोदा पालिकेचे चित्र 

sakal_logo
By
सम्राट महाजन

तळोदा (नंदुरबार) : तळोदा पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या दिवशीच सत्ताधारी उपनगराध्यक्षांना उपोषणाचे अस्त्र काढावे लागल्याने तळोद्यातील राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आले आहे. सत्ताधारी भाजपमधील गटबाजी, मतभेद टोकाला गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपला फटका बसत एखादा गट बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पुढे काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 
तळोदा पालिकेत भाजपची सत्ता आहे. तीन वर्षांपासून लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या नेतृत्वात शहराचा गाडा हाकला जात आहे. यादरम्यान सत्ताधारी भाजपच्या गोटात लहान- मोठे वाद उद्भवत होते, मात्र कधी सामंजस्याने समन्वय साधून तर कधी वरिष्ठांनी यात लक्ष घालीत ते वाद वेळीच रोखले. त्या वादाचे रूपांतर मनभेदात होऊ दिले नाही. मात्र गेल्या वर्षी मेमध्ये पालिकेची सभाच रद्द करण्याची नामुष्की आली होती. अजेंड्यावर असलेल्या काही विषयांवरून सत्ताधारी भाजप नगरसेवकांमध्येच मतभेद उफाळून आले होते, त्यानंतर मतभेद वाढतच गेल्याचे बोलले जाते. 

सत्‍ताधारी भाजप विभागले
परवा तर अंतर्गत कलहाने कळसच गाठला. पालिका सभेच्या दिवशीच उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी यांनी आपल्या प्रभागात विकासकामे करण्यावरून दुजाभाव होत असल्याचे निवेदन देत एकदिवसीय उपोषण केले. या वेळी त्यांनी पालिका कारभारावरही गंभीर आरोप केले आहेत. सत्तास्थापनेपासूनच पालिकेतील सत्ताधारी भाजप गटात विभागल्याचे बोलले जाते. महत्त्वाची बाब म्हणजे उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी भाजपचे शहराध्यक्ष योगेश चौधरी यांच्या पत्नी आहेत. त्यात भाजप शहराध्यक्षांचे यापूर्वीही नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्याशी मतभेद झाल्याचे बोलले जाते. मात्र परवाच्या घटनेवरून भाजपमधील गटबाजी, अंतर्गत वाद, मतभेद अगदी टोकाला गेल्याचे स्पष्ट होते, नाही तर उपनगराध्यक्षांना उपोषणाची वेळच आली नसती. 

नगराध्यक्षांसमोर दुहेरी आव्हान 
शहरातील ‘विकासकामांना आमचा विरोध नाही’ असे म्हणत पालिका कारभारात नेहमी सकारात्मक राहणारे काँग्रेसचे नगरसेवक परवाच्या सभेत तीन वर्षांत पहिल्यांदाच आक्रमक दिसले. त्यामुळे आता नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्यासमोर पक्षांतर्गत असलेली गटबाजी सोबतच पालिकेतील विरोधी काँग्रेस गटाचाही मुकाबला करायचा आहे. त्यामुळे नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्यापुढे दुहेरी आव्हान असणार आहे व यामुळे पुढील काळात शहरातील राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. 

आमदारांच्या पुढाकाराची अपेक्षा 
आमदार राजेश पाडवी भाजपची पाळेमुळे तालुकाभर व विधानसभा क्षेत्रात घट्ट करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. त्यामुळे शहरातील भाजप अंतर्गत असलेली गटबाजी व मतभेद संपुष्टात यावेत, यासाठी त्यांनीच पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. दुसरीकडे भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी पालिकेत सुरू असलेल्या घडामोडींवर काय प्रतिक्रिया देतात व सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत मतभेद कसे मिटवतात, याकडेच सामान्य कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे