esakal | पावरी भाषेतील शॉर्ट फिल्‍म; लसीकरणाबाबत जनजागृती, सोशल मिडीयावर व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination short film

पावरी भाषेतील शॉर्ट फिल्‍म; लसीकरणाबाबत जनजागृती, सोशल मिडीयावर व्हायरल

sakal_logo
By
सम्राट महाजन

तळोदा (नंदुरबार) : सातपुड्याच्या दुर्गम भागातील नागरिकांमध्ये कोरोनाबाबत (Corona vaccination) विशेषतः लसीकरणाबाबत प्रबोधन व्हावे व त्यांच्यामधील गैरसमज दूर व्हावे, यासाठी उलगुलान फाउंडेशन संचालित धडगाव येथील आदिवासी जनजागृती टीम पुढे सरसावली आहे. या टीमने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी पावरी बोलीभाषेत शॉर्ट फिल्म्स (Short film) तयार करून सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) केली आहे. स्थानिक भाषेत असल्याने या शॉर्ट फिल्म्सला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असून, नागरिकांवर त्याच्या प्रभाव पडत आहे. (Vaccination satpuda aria in pawari language short film)

दुर्गम भागातील आदिवासी बांधवांमध्ये कोरोनाबाबत विशेषतः लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणावर गैरसमजुती आहेत. त्यामुळे या भागात लसीकरणाला जेमतेम प्रतिसाद मिळत आहे. या गैरसमजुती दूर व्हाव्यात, यासाठी उलगुलान फाउंडेशन संचालित धडगाव येथील आदिवासी जनजागृती टीमने पावरी बोलीभाषेत शॉर्ट फिल्म्स तयार करीत, त्यांना सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत.

हेही वाचा: लस घ्‍यायचीय तर कोरोना निगेटिव्हचा अहवाल हवा

लसीकरणाबाबत प्रबोधन

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग, वारंवार हात धुणे याबरोबरच नागरिकांनी लसीकरण करावे यासाठी ‘ऑक्सिजन’, ‘मास्क’, ‘कोरोना लस’ व ‘कोरोनावाला बाबा’ नावाच्या चार शॉर्ट फिल्म बनवून त्याद्वारे कोरोना आजाराची लक्षणे कोणती? लक्षणे असलेल्या नागरिकांनी कोणती चाचणी करावी? याबाबत या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आवश्यक ती जनजागृती करत आहे. तसेच विशेष करून लसीकरणाचे महत्त्व व त्यासाठी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, याबाबतही शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून प्रबोधन केले जात आहे.

फिल्‍म सोशल मिडीयावर व्‍हारयल

शॉर्ट फिल्म्समध्ये धडगाव परिसरातील अर्जुन पावरा, राकेश पावरा, कल्पेश पावरा, दीपक पावरा, किरण पावरा, वर्षा शेल्टे आदींच्या भूमिका असून, इतर टीम सदस्य परिश्रम घेत आहेत. सोशल मीडियावर सर्व शॉर्ट फिल्म्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या असून, त्या फिल्म्स आदिवासी पावरी भाषेत असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. सध्या प्रशासनाकडून लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागातील नागरिकांमध्ये लसीकरणाची जनजागृती करताना ग्रामसेवक, आशा कार्यकर्त्या, शिक्षक, तलाठी या शॉर्ट फिल्म्स स्थानिक नागरिकांना दाखवीत आहेत. त्यामुळे एकप्रकारे या शॉर्ट फिल्म्सची प्रशासनाला मदतच होत आहे.

हेही वाचा: चोपड्यात लोकसहभागातून ऑक्सिजन प्रकल्प; रोज सव्वा लाख लिटर निर्मिती

खेड्यापाड्यात जाऊन तेथील तरुणांना मदतीला घेऊन या शॉर्ट फिल्म्स नागरिकांना दाखवून त्यांच्यामधील कोरोनाबाबत व लसीकरणाबाबतच्या गैरसमजुती दूर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यात चांगलेच यश मिळत आहे.

-राकेश पावरा, आदिवासी जनजागृती टीम.

आदिवासी जनजागृती टीम मागील चार वर्षांपासून विविध सामाजिक मुद्द्यांवर काम करीत आहे. सध्या कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपक्रम राबवित सातपुड्याच्या दुर्गम भागात लसीकरणाबाबत जनजागृती करण्यावर टीमने भर दिला आहे.

-अर्जुन पावरा, आदिवासी जनजागृती टीम