esakal | महाराष्ट्रातील वाहनांना गुजरातमध्ये प्रवेशबंदी; पोलिसांनी वाहने परतविली 
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra gujarat border

महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणाऱ्या लोकांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्यास गुजरातमध्ये प्रवेश दिला जात आहे, अन्यथा परतीचा प्रवास करावा लागणार आहे,

महाराष्ट्रातील वाहनांना गुजरातमध्ये प्रवेशबंदी; पोलिसांनी वाहने परतविली 

sakal_logo
By
सचिन पाटील

नवापूर (जळगाव) : महाराष्ट्रातील वाहनांना गुजरातमध्ये प्रवेश नाकारत गुजरात पोलिसांनी वाहने परत पाठविली असून, गुजरातमध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या महाराष्ट्रीय लोकांना याचा मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्रात दररोज २५ ते ३० हजार कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने गुजरात सरकार सतर्क झाले आहे. 
महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणाऱ्या लोकांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्यास गुजरातमध्ये प्रवेश दिला जात आहे, अन्यथा परतीचा प्रवास करावा लागणार आहे, असे परिपत्रक गुरुवारी (ता. २५) सायंकाळी गुजरात आरोग्य विभागाने काढले आहे. यावर गुजरात पोलिसांनी अंमलबजावणी सुरू केली आहे. 

आरोग्‍य, पोलिस पथक तैनात
उच्छल पोलिसांनी महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील तपासणी नाक्यावर आरोग्य विभाग व पोलिस दलाचे पथक तैनात केले आहे. महाराष्ट्रातून गुजरातमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाची तपासणी सुरू करण्याचे आदेश आरोग्य विभाग व पोलिस दलाला दिल्याचे वाहनचालक सांगत आहेत. 

तरच दिला जातोय प्रवेश
कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्यास गुजरातमध्ये प्रवेश दिला जात आहे, अन्यथा महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील उच्छलहून महाराष्ट्रात परत पाठविण्यात येत आहेत. गुजरातेतील आरोग्यपथक २४ तास सीमावर्ती भागात वाहनचालकांची थर्मल स्कॅनिंग, कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याचा तपास करीत आहेत. 

वाहनांची कसून तपासणी 
तोंडाला मास्क नसल्यास गुजरात पोलिस हजार रुपयांचा दंड महामार्गावर वसूल करीत आहेत. महाराष्ट्र पासिंग फोरव्हीलर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. जळगाव व धुळे जिल्ह्यातील अनेक वाहनचालकांचे कुठलेही कारण ऐकून न घेता परतीचा प्रवास करावा लागला आहे. गुजरातमध्ये जाण्यासाठी कोरोना रॅपिड किंवा आरटीपीसीआर तपासणी रिपोर्ट असणे गरजेचे आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील लोक मोठ्या संख्येने गुजरातमध्ये कोरोनाच्या उपचारासाठी जात असल्याने त्यांची मोठी फसगत होणार आहे. नवापूर सीमा तपासणी नाक्यावर रॅपिड टेस्‍टचे कॅम्प लावण्याने गुजरातमध्ये जाणाऱ्यांची सोय होईल, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

संपादन- राजेश सोनवणे
 

loading image