esakal | धुळे जिल्ह्यात उलाढालीचा ‘श्रीगणेशा’!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule City

धुळे जिल्ह्यात उलाढालीचा ‘श्रीगणेशा’!

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी


धुळे : कोरोनामुळे मंदीच्या लाटेत रूतलेली धुळे शहरासह जिल्ह्यातील व्यावसायिक उलाढाल शुक्रवारी आबालवृद्धांचे अराध्य दैवत श्री गणरायाच्या आगमनाने उसळली. ‘कोरोना गो’ म्हणत आणि त्याविषयी कुठलिही भीती न बाळगता, नियम बाजूला ठेवत धुळेकरांनी श्रीगणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात थाटात स्वागत केले. त्यामुळे सर्वच बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण होते. त्यात निरनिराळे विक्रेते आणि भाविकांची गर्दी मावत नव्हती.

हेही वाचा: विघ्नहर्त्याची मूर्ती घेऊन जाताना पितापुत्रावर विघ्न

दोन वर्षांनंतर शहरासह जिल्ह्यात गणेश चतुर्थी अर्थात, गणेशोत्सवाच्या शुक्रवारी पहिल्या दिवशी बाजारपेठेत प्रथमच उलाढालीचा श्रीगणेशा झाला. त्यामुळे विक्रेते, व्यावसायिक सुखावले. यात सरासरी पंचवीस कोटींहून अधिक रकमेची उलाढाल झाल्याची माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. लहान मूर्ती शंभर, मध्यम दोनशे आणि नियमानुसार उंचीतील मूर्ती पाच हजारांपर्यंत विक्री होत होती. शहरात आग्रा रोड, देवपूरसह चौफेर यंदा मूर्ती, पूजा, सजावटीसह विविध प्रकारच्या साहित्य विक्रेत्यांची संख्याही वाढलेली दिसली. हातपोट असलेल्या विक्रेत्यांची मोठी गर्दी होती. रस्त्यांच्या दुतर्फा विक्रेते आणि मधोमध चालायलाही जागा नाही इतकी बाजारपेठ भाविकांच्या गर्दीने फुलली होती. बहुसंख्य भाविक, विक्रेत्यांनी मास्क वापराच्या नियमाला हरताळ फासल्याचे दिसले. दुपारी काहीवेळ पावसाने हजेरी लावली. त्यामुळे विक्रेत्यांची तारांबळ उडाली. दुपारनंतर पुन्हा बाजारपेठेत गर्दी उसळली.

हेही वाचा: कर्नाटकात आहेत अनेक अदभूत गोष्टी..जाणून घ्या


सवाद्य मिरवणुकीतून आगमन
कोरोनासंबंधी विविध नियमांमुळे सार्वजनिक मंडळांची संख्या यंदा रोडावलेली दिसली. मात्र, घरोघरी श्री गणरायाची विधिवत स्थापना होत असल्याने आबालवृद्धांनी बाजारपेठेत उत्साहाने गर्दी केली होती. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. बालकांसह वाहने, हातगाडीवरून काही सार्वजनिक गणेश मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात श्री गणरायाची मिरवणूक काढली. त्यामुळे वाद्य विक्रेत्यांचीही चांदी झाली. सार्वजनिक गणेश मंडळांना साधेपणाने आणि ऑनलाइन दर्शनाची सुविधा देऊन गर्दी टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन आहे. शिवाय शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाच्या आगमनामुळेही आर्थिक उलाढालीला सुगीचे दिवस आले आहेत. यात टाळ-मृदंग, पारंपरिक गांधी टोपी परिधान करत पोलिस अधिकारी, राजकीय मंडळी, तृतीयपंथी आणि नागरिकांनी विधिवत, मंत्रोच्चारात, आरतीतून श्री गणरायाची घरोघरी स्थापना केली. पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला असून, नागरिकांनी शांततेत गणेशोत्सव पार पाडावा, असे आवाहन प्रशासकीय प्रमुख अधिकाऱ्यांनी केले आहे.

loading image
go to top