esakal | धुळे महापालिका..ठेकेदारांवर भलतीच उदार
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule Municipal Corporation

धुळे महापालिका..ठेकेदारांवर भलतीच उदार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे: शहरातील वादग्रस्त डेंगी, चिकूनगुनिया यासह साथीचे विविध आजार आणि अस्वच्छता, खड्डेमय रस्ते, कचरा संकलनप्रश्नी महापालिकेत (Dhule Municipal Corporation) मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत (Standing Committee Meeting) सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच मालमत्ता कराच्या शास्तीमाफीतून मनपाला तब्बल नऊ कोटी रुपये मिळाले. मात्र, प्रशासनाने महिन्याभरात विविध बँकांमधील मुदतठेव मोडून ठेकेदारांची देणी दिली. प्रशासन ठेकेदारावर (Contractor) का उदार झाले, या निर्णयापूर्वी सभेची मान्यता घेतली का, असा प्रश्‍न उपस्थित करत सदस्य सुनील बैसाणे यांनी आगपाखड केली. त्यावर अधिकारी निरुत्तर झाले.

हेही वाचा: खानदेशातील पहिले रात्रकालीन महाविद्यालय सुरू!

महापालिकेत स्थायी समितीची सभा झाली. नगरसेवक नागसेन बोरसे हंगामी सभापती होते. अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य बैसाणे, शीतल नवले, अमोल मासुळे, अमिन पटेल, किरण कुलेवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री. नवले यांनी ‘सकाळ’चा अंक झळकावत डेंगी व साथीच्या आजारांचा मुद्दा मांडला. शहरात साथीचे आजार नियंत्रणासाठी रासायनिक फवारणीसाठी दिग्विजय एंजरप्राइजेसला ठेका दिला. त्यासाठी दरमहा ४० लाखांच्या देयकांना मंजुरी दिली. त्यानुसार वार्षिक चार कोटी ७५ लाख, तर तीन वर्षांसाठी १४ कोटी २५ लाख दिले जातील. मात्र या ठेक्याबाबत दिशाभूल करणारी टिपणी प्रशासनाने ठेवली. चुकीचे करारनामे केले आहेत. या ठेक्यात संगनमताने सव्वा कोटीचा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप आहे. चुकीची टिपणी लिहिणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा उपोषण करेन, असे श्री. नवले म्हणाले. सदस्य मासुळे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने या ठेक्यात अपहार होत असल्याचा आरोप केला. दिग्विजय एंटरप्राइजेसकडून फवारणी व जनजागृतीही होत नाही. त्यामुळे या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावे. शहरात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. घंटागाड्यांची सेवा नाही. त्यामुळे रुग्णसंख्या वाढते आहे. कचरा संकलनाच्या नवीन ठेक्याला कार्यादेश का दिला गेला नाही, असा प्रश्‍न सदस्य पटेल यांनी केला. सदस्य बैसाणे यांनी उद्योजक संजय अग्रवाल यांनी देवपूरमध्ये गॅसवरील शवदाहिनीसाठी ५० लाखांच्या खर्चाची तयारी दर्शविली. तरीही चार महिन्यांपासून कार्यादेश का दिला जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर सभापती बोरसे यांनी लवकर कार्यवाहीची माहिती दिली.

हेही वाचा: धरणे ‘ओव्हर फ्लो’..हतनूर, वाघूरचे दरवाजे उघडल्याने नद्यांना पूर


प्रशासन भाजपला बदनाम करतेय
महापालिका प्रशासन अनियमित कारभारातून सत्ताधारी भाजपला बदनाम करत आहे. त्यामुळे सदस्यांना जनतेसमोर रोष पत्करावा लागत आहे, अशा शब्दांत सदस्य बैसाणे, मासुळे यांनी संताप व्यक्त केला.

loading image
go to top