esakal | रस्ता दुरुस्तीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांने केली पदरमोड  ! 
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ता दुरुस्तीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांने केली पदरमोड  ! 

धनदाईदेवी मंदिर व नाशिक जिल्ह्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी वाहत असल्याने वाहनांना अडथळे येत होते.

रस्ता दुरुस्तीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांने केली पदरमोड  ! 

sakal_logo
By
दगाजी देवरे

म्हसदी : समाधानकारक पावसामुळे येथील अमरावती नदी १७ वर्षांनंतर प्रथमच वाहू लागली. धनदाईदेवी मंदिर व नाशिक जिल्ह्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी वाहत असल्याने वाहनांना अडथळे येत होते. यामुळे सिमेंटचे सहा नवीन पाइप टाकून मार्ग मोकळा करण्यात आला. 

विभाग नियंत्रकांची पदरमोड 
नदीत पाणी असल्याने वाहणे चालविणे अवघड होत आहे. बुधवारी (ता.२८) सकाळी नाशिककडे जाणारी बस उलटण्याची भीती व्यक्त होत होती. रस्त्याअभावी बससेवा बंद होऊ नये, म्हणून येथील रहिवासी तथा राज्य परिवहन महामंडळाचे जळगावचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे व श्री स्वामी समर्थ पेट्रोलपंपाच्या संचालिका शैलेजा देवरे यांनी पदरमोड करत जेसीबीने सिमेंटचे सहा पाइप टाकून रस्ता दुरुस्त केला.

विभाग नियंत्रक देवरेंसह धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवरे, प्रकाश देवरे, गोकुळ विसपुते, शरद भदाणे, प्राथमिक शिक्षक प्रवीण देवरे, शांतिलाल देवरे, रमेश देवरे, वीरेंद्र देवरे आदी उपस्थित होते. येथील कुलस्वामिनी धनदाईदेवी मंदिराजवळ दर्शन व नवसपूर्तीसाठी भाविकांची वर्षभर वर्दळ असते. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील भाविक व वाहनधारक याच मार्गाने मार्गस्थ होतात. दोन महिन्यांपासून अमरावती नदीपात्र प्रवाही झाले आहे. यापूर्वी धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाने दोन पाइप टाकून मोरीचे काम केले होते. अजून नवीन सहा पाइप टाकल्याने रस्ता मोकळा झाला आहे. नदीत मोरी झाल्याने भाविकांसह काळगाव, नामपूर व नाशिकला जाणाऱ्या वाहनधारकांची सोय होणार आहे. यंदा प्रथमच समाधानकारक पाऊस झाल्याने पाणीप्रश्न मिटला आहे. 

अमरावती नदी वाहू लागल्याने वाहनधारकांची गैरसोय होत होती. सहा पाइप टाकून मार्ग मोकळा झाला. यामुळे विशेषतः भाविकांची गैरसोय टळणार आहे. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बस सुरळीत सुरू राहतील. 
-राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक, जळगाव 

संपादन- भूषण श्रीखंडे