शिक्षणासाठी उभारली इमारत अन्‌ निवासासाठी कोंडवाडा,आश्रमशाळेची व्यथा 

महेंद्र महाजन
गुरुवार, 29 मार्च 2018

नाशिक : आदिवासी मुलींच्या शिक्षणाबद्दल उदासिनता किती पराकोटीची आहे हे देवगावच्या (ता. त्र्यंबकेश्‍वर) सरकारी आश्रमशाळेत जाताक्षणी पहायला मिळते. शिक्षणासाठी 18 खोल्यांची अद्ययावत इमारत उभारण्यात आली. पण इथल्या मुलींना कोंडवाड्यासारखा निवास करावा लागतो. आदिवासी विकास विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाने सुविधांची वाणवा झाली. 

नाशिक : आदिवासी मुलींच्या शिक्षणाबद्दल उदासिनता किती पराकोटीची आहे हे देवगावच्या (ता. त्र्यंबकेश्‍वर) सरकारी आश्रमशाळेत जाताक्षणी पहायला मिळते. शिक्षणासाठी 18 खोल्यांची अद्ययावत इमारत उभारण्यात आली. पण इथल्या मुलींना कोंडवाड्यासारखा निवास करावा लागतो. आदिवासी विकास विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाने सुविधांची वाणवा झाली. 

नाशिकपासून 65 किलोमीटर अंतरावरील देवगावच्या आश्रमशाळेत पहिली ते बारावीपर्यंत वर्ग आहेत. दहावी आणि बारावीची परीक्षा झाल्याने आता इथे पहिली ते नववी व अकरावी च्या 315 आदिवासी मुली शिक्षण घेताहेत. मंगळवारी (ता. 27) पोटात दुखू लागल्याने आठ मुलींवर उपचारासाठी धांदल उडाली आणि काल (ता. 28) जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी सात मुलींना दाखल करण्यात आले. याचपार्श्‍वभूमीवर आज दुपारी आश्रमशाळेत विदारक चित्र पाह्यला मिळाले.

 दुपारी शेडमध्ये मुली मुंढेगावच्या सेंट्रल किचनमधून आलेले भोजन घेत होत्या. वरण-भात, राजमा उसळ आणि रोटी असा मेनू होता. त्यातील रोटी आहेत की रोट आहेत असा प्रश्‍न तयार झाला. मग त्याबद्दल विचारणा केल्यावर इथल्या शिक्षकांनी रोटीच्या गुणवत्ताबद्दल नाराजीचा सूर आळवला. तितक्‍यात उन्हाच्या तडाख्यात रोटी गिळवत नसल्याने काही मुली ताटात रोटीसह इतर खाद्यपदार्थ घेऊन फेकून देण्यासाठी निघाल्या असल्याचे दिसून आले. 

असह्य उकाड्यात व्हरांड्यात वाचन 
विद्यार्थिनींना झालेल्या शारीरिक त्रासामुळे चर्चेत आलेल्या देवगावच्या आश्रमशाळेच्या भेटीसाठी त्र्यंबकेश्‍वरचे तहसिलदार महेंद्र पवार पोचले होते. त्याचवेळी आपल्या मुलींना त्रास तरी होत नाही ना? हे पाहण्यासाठी आदिवासी पालकांनी इथे गर्दी केली होती. पालक मुलींना शिक्षणासाठी मिळणाऱ्या सुविधांच्या अभावामुळे नाराजी व्यक्त करत होत्या. तेंव्हा श्री. पवार यांनी परीक्षा जवळ आल्याने मुलींना घरी घेऊन जाऊ नका, प्रश्‍नांची सोडवणूक करण्यात येईल असा शद्ब पालकांना देत होते. आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक आश्रमशाळेत पोचले होते. एका मुलीला ताप आला असून मुलींच्या इलाजासाठी औषध मागवून घेण्यात येत असल्याची माहिती डॉक्‍टरांनी श्री. पवार यांना दिली.

-------
कुणाला अभियंता, तर कुणाला शिक्षक व्हायचयं! 
भोजन आटोपून अकरावीच्या मुली सावलीत बसल्या होत्या. त्यांच्याशी संवाद साधत असताना दहावीमध्ये बहुतांश मुलींना साठ टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळाल्याचे संवादातून स्पष्ट झाले. या मुलींमध्ये प्रचंड दुर्दम्य इच्छाशक्ती असून त्यातील कुणाला शिक्षक, अभियंता, तर कुणाला पोलिस अधिकारी व्हायचे असल्याचे संवादातून जाणवले.

संगणक, इंटरनेट तुम्हाला माहिती आहे काय? असे विचारल्यास सगळ्या मुलींनी एका सूरात हो ! असे उत्तर दिले. मग त्यावर तुम्हाला संगणक हाताळायला मिळतो काय? अशी विचारणा केल्यावर प्रत्येकीने नकारार्थी मान डोलावली. प्रत्येकीच्या चेहऱ्यावर आत्मविश्‍वास ओसांडून वाहत होता,

देवगावच्या ठळक नोंदी 
- अकरावी-बारावीसाठी ः 3 शिक्षक आणि एक तासिका शिक्षक 
- माध्यमिक शिक्षण ः 5 शिक्षकांपैकी एक शिक्षक मुंढेगावच्या आश्रमशाळेत प्रतिनियुक्तीवर 
- प्राथमिक शिक्षण ः 6 शिक्षक आणि एक तासिका शिक्षक 
- कामाठी-स्वयंपाकी ः दहा पैकी पाच जण मुंढेगावच्या सेंट्रल किचनसाठी प्रतिनियुक्ती 
- पोट दुःखीच्या त्रास सुरु झाल्याच्या अगोदर मुलींसाठी उडदाची डाळ, पोळी, भात, वरण, भोपळ्याची भाजी असा होता मेनू 
- विजपुरवठा खंडीत झाल्यावर मुलींसाठी टॅंकरने मागवावे लागते पाणी 
- आश्रमशाळेच्या आवारात आरोग्य केंद्राची नवीकोरी इमारत उभी पण आरोग्य कर्मचाऱ्यांचा नाही पत्ता 
 आश्रमशाळेपासून 8 किलोमीटर अंतरावरील वैतरणा-धारगावऐवजी मुलींच्या आरोग्यासाठी 45 किलोमीटरवरील आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यवस्था 
 उष्ण पाण्यासाठी सौर ऊर्जेचे पॅनल दिमाखात उभी आहेत पण त्याचा विनियोग होत नाही आणि त्याची दुरावस्था का झाली याची झाली नाही चौकशी 

पालक,शिक्षक,अधिकाऱ्याचे बोल
""आम्हाला प्रत्येकवेळी आमच्या मुलीला पाह्यला यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे शिक्षकांनी मुलींची काळजी घ्यायला हवी. आज सकाळी आम्ही आश्रमशाळेत आल्यावर एक शिक्षक भेटले. काही वेळानंतर इतर शिक्षक दिसून आले आहेत.'' 
- महादू लोभी (पालक) 

""उन्हाच्या तडाख्यामुळे मुलींना त्रास होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे खोल्यांमधील खाटा मोकळ्या करुन मुलींना जागा करुन द्यायला हवी. एका खाटेवर दोनपेक्षा अधिक मुलींना झोपावे लागते. काही मुलींना खाटा-गाद्या नाहीत. ही गैरसोय तातडीने दूर होण्याची आवश्‍यकता आहे.'' 
- भगवान लोभी (पालक) 

""पाण्याची मोटर बंद पडल्यावर मुलींना धरणाकडे जावे लागते. धरणातील पाण्याच्या स्वच्छतेचा प्रश्‍न कायम आहे. तसेच भोजनाची व्यवस्था केल्या जाणाऱ्या शेडमध्ये शेणाच्या वासाला मुलींना सामोरे जावे लागते. त्यामुळे स्वच्छतेला अधिक महत्व द्यायला हवे.'' 
- सोमनाथ गोहिरे (खरोलीचे सरपंच) 
 
""आश्रमशाळेच्या नवीन इमारतीमध्ये तळमजल्यावर निवासाची आणि वरच्या मजल्यावर दोन सत्रांमध्ये मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था करता येऊ शकते. त्यासंबंधाने वरिष्ठांना प्रस्ताव पाठवला जाईल. शिवाय आरोग्याच्या समस्येचे निराकारण करण्यासाठी कायमस्वरुपी व्यवस्था करण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना देण्यात येईल. इंटरनेट सुविधेचा विषय मार्गी लावला जाईल.'' 
- महेंद्र पवार (त्र्यंबकेश्‍वरचे तहसिलदार) 

Web Title: marathi news aadhvasi hostal