motivation : यांनी घेतली वयाच्या साठाव्या वर्षी पीएचडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

स्पर्धा परीक्षेचा धागा पकडून त्यांनी "सामान्य ज्ञान अभ्यासक्रमाची रोजगार संदर्भातील उपयुक्‍तता' या विषयावर चिकित्सक संशोधन केले, हे विशेष ! 

अमळनेर : शिक्षण घेण्यासाठी वयाची अट नसते. प्रत्येक व्यक्‍ती हा शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो. या पार्श्वभुमीवर निवृत्तीच्या दोन महिने अगोदर प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. ओ. माळी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी पीएचडी संपादन केली. त्यांनी आपल्या सेवा काळात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सुमारे पाचशे विद्यार्थी प्रशासनात वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. स्पर्धा परीक्षेचा धागा पकडून त्यांनी "सामान्य ज्ञान अभ्यासक्रमाची रोजगार संदर्भातील उपयुक्‍तता' या विषयावर चिकित्सक संशोधन केले, हे विशेष ! 

हेपण पहा -  आदर्श विवाह : विवाहाचा खर्च शहिद जवानांच्या पाल्यांचा शिक्षणसाठी

प्रा. माळी यांचे प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षण खानदेश शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये तसेच प्रताप महाविद्यालयामध्ये झाले. ज्या शाळा, महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे धडे घेतले; त्याच महाविद्यालयात ते सप्टेंबर 1983 मध्ये रुजू झाले. ते गेल्या 37 वर्षापासून अध्यापनाचे कार्य करीत आहेत. सद्यःस्थितीत ते वाणिज्य विभागाचे प्रमुख आहेत. ते गेल्या बावीस वर्षापासून करिअर कौन्सलिंग सेंटरचे प्रमुख म्हणुन काम पाहत आहेत. हे सेंटर म्हणजे स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन करणारे एक छोटे विद्यापीठ आहे. या केंद्रातील अभ्यासिकेत शेकडो विद्यार्थी अभ्यास करीत असतात. वेगवेगळ्या विषयांवर अनेक तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करीत असतात. याचाच परिपाक म्हणुन आतापर्यंत सुमारे पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रशासनात वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. 

क्‍लिक करा -कॅडबरीपेक्षाही कांदा विकावा लागतो मातीमोल 

मनात खंत असल्याने पन्नासीनंतर संशोधन 
स्पर्धा परीक्षांची प्रेरणा विद्यार्थ्यांना देत असतात. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये मार्गदर्शन केले आहे. अध्यापनाचे कार्य करीत असताना त्यांच्या नावासमोर डॉक्‍टरेट नसल्याची खंत होती. ही खंत पूर्ण करण्यासाठी त्यांनी वयाच्या पन्नासीनंतर पीएचडीसाठी संशोधन सुरु केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत त्यावेळी पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षाला सामान्य ज्ञान अर्थात जीके हा विषय सुरु झाला. हाच धागा पकडून त्यांनी आपले संशोधन सुरु केले. 

कुलगूरूंच्या हस्ते पीएच.डी प्रदान 
निवृतीच्या शेवटच्या टप्प्यात अनेक व्यक्‍ती शरिराने व मनाने थकून गेलेले असतात. त्याच वयात त्यांनी केलेले संशोधन हे तरुणांसाठी रोल मॉडेल ठरत आहे. त्यांना नुकतेच वाणिज्य व व्यवस्थापन या विद्याशाखेतून विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. पी. पाटील यांच्या हस्ते पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यांना डॉ. एन. बी. गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ. योगेश तोरवणे, डॉ. नितीन बारी, डॉ. एन. बी. गोसावी, प्रा. डॉ. शाम साळुंखे, बहिस्थ परीक्षक डॉ. एम. आर. इंगळे, गिरीश माळी आदी उपस्थित होते. त्यांच्या या यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, संचालक योगेश मुंदडे, नीरज अग्रवाल, हरि वाणी, डॉ. संदेश गुजराथी, जितेंद्र जैन, अध्यक्ष अनिल कदम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. 

निवृत्तीनंतर पुस्तक प्रकाशन 
येत्या एप्रिल महिन्यात प्रा. डॉ. माळी हे निवृत्त होत आहेत. निवृत्तीनंतरही ते स्पर्धा परीक्षांची मशाल मार्गदर्शनाच्या माध्यमातून तेवत ठेवणार आहेत. अनेक विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठीही मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे निवृत्तीनंतर ते स्पर्धा परीक्षा व विद्यार्थी या विषयावर पुस्तकही प्रकाशित करण्याचा मानस आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner motivate proffecer mali 60 year phd