आदर्श विवाह : विवाहाचा खर्च शहिद जवानांच्या पाल्यांचा शिक्षणसाठी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

लग्नाची तारीख निश्‍चित करण्यात आली. मात्र विवाह हा नोंदणी पद्धतीने व्हावा अशी विनंती मनीषने माता-पिता व होणाऱ्या सासू-सासऱ्यांना केली. तसेच विवाहसाठी लागणारा सर्व खर्च हा देशाच्या सेवेसाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या मूलांच्या उच्च शिक्षणासाठी करावयाचा असल्याचा मानस व्यक्त केला.

शहादा : आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानाही आपल्या मुलाचा विवाह नोंदणी पद्धतीने केला. मात्र विवाहासाठी लागणारा सर्व खर्च देशसेवा करताना शहीद झालेल्या सैनिकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी देण्याचा निर्णय घेऊन समाजसेवेचा आगळा वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. विशेष म्हणजे पालकांसह दोन्ही वर- वधू उच्चशिक्षित असून दोघेही मुंबई येथे मोठ्या पदावर कार्यरत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील गुजर समाजातील या अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा होत आहे. 

हेपण पहा - सोन्यात गुंतवणुकीची "गोल्डन' संधी 

शहादा (मुळ गाव शिरूड दिगर, ता. शहादा) येथील वीज वितरण कंपनीतील सेवानिवृत अभियंता विपीन देविदास पाटील यांचा एकुलता एक मुलगा मनिष याचे लग्न मुंबई (मुळ गाव भरवाडे, ता. शिरपूर) येथील डॉ. अजय नरोतम पाटील यांची कन्या वृषाली हिच्याशी रितीरिवाजानुसार जमला. परिवाराच्या संमतीने लग्नाची तारीख निश्‍चित करण्यात आली. मात्र विवाह हा नोंदणी पद्धतीने व्हावा अशी विनंती मनीषने माता-पिता व होणाऱ्या सासू-सासऱ्यांना केली. तसेच विवाहसाठी लागणारा सर्व खर्च हा देशाच्या सेवेसाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या मूलांच्या उच्च शिक्षणासाठी करावयाचा असल्याचा मानस व्यक्त केला. मनिषच्या अनोख्या मागणीला नववधू वृषालीसह दोन्ही परिवाराने संमती दिली. हा विवाह सोहळा 11 मार्चला नंदुरबार येथील रजिस्टर कार्यालयात पार पडला. 

हेपण पहा - "लालपरी'ला जडला "कोरोना व्हायरस'!

ना पत्रिका ना प्रिवेडींग फोटोशुटींग 
समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे कुठलीही पत्रिका नाही, नातेवाईकांना आमंत्रण नाही, लग्नाचा बडेजाव नाही की वारेमाप उधळपट्टी नाही. प्रिवेडिंग, वेडिंग व आफ्टर वेडिंग फोटोसेशन असे काही नाही. गुजर समाजातील लग्न म्हटले म्हणजे अतिशय दिमाखदार पद्धतीने होत असतात. किमान दोन ते तीन हजार नागरिकांच्या साक्षीने बहुसंख्य विवाहसोहळे पार पडले आहेत. बदलत्या काळात विवाह सोहळे अतिशय दिमाखदार होत आहेत. लग्न राजेशाही पद्धधतीने व्हावे, प्रत्येकाने त्याचे कायम नाव काढावे अशी इच्छा नववधूसह त्यांच्या माता- पित्यांची असते. मात्र स्वतःच्या लग्नात वारेमाप खर्च करून पैशाची उधळपट्टी न करण्याचा निर्णय घेतला. 

दोन्हीही उच्च शिक्षित 
वर मनीष हा स्थापत्य अभियंतासह एमबीए असा उच्चशिक्षित असून मुंबई येथील एका बॅंकेत उच्च पदावर कार्यरत आहे. दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ आहे. तर नववधू वृषालीने गणित विषयात पदवीत्तर पदवी प्राप्त केली असून तीही मुंबई येथे एका कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. या विवाह सोहळ्यासाठी दोन्ही परिवाराची आर्थिक स्थिती सक्षम असल्याने सहाजिकच मोठ्या दिमाखात लग्न पार पाडता आले असते. मात्र असे न करता नोंदणी पद्धतीने विवाह करून वाचलेला सर्व खर्च हा बॅंकेत एफडी करून त्यातून मिळणाऱ्या व्याजातून मृत सैनिकांच्या पाल्यांसाठी शिक्षणासाठी करण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada registered marriage Expenditure Martyr jawan child education