Video पोलिसांना कायदा सुव्यवस्थेसाठी सैनिकी शाळांमधील माजी विद्यार्थ्यांची घेणार मदत  : माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील

उमेश काटे
शनिवार, 28 मार्च 2020

सैनिकी शाळेतील माजी विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत देशसेवेची संधी मिळणार असून त्यांनी राष्ट्रहित जोपासण्यासाठी स्वयं प्रेरणेने मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन राज्य सैनिकी शाळा असोसिएशन, राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी केले आहे. 

अमळनेर- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने 21 दिवसांचे लॉक डाऊन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस व गृहरक्षक दला वर कामाचा अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. यासाठी त्याना राज्यातील सैनिकी शाळाची  मदत घेता येणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे.

लॉक डाऊनमध्ये पोलिसावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अडचणी येत आहेत. ज्या पद्धतीने आरोग्य विभाग विविध कामासाठी अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांची मदत घेत आहेत. त्याच पध्दतीने आपल्याला काहीतरी मदत करता येईल का? या उद्देशाने विजय नवल पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा केली. सकारात्मक चर्चे नंतर प्रत्येक जिल्ह्यातील सैनिकी शाळा च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी याबाबतचा योग्य निर्णय घेतल्यास संकटसमयी केंद्र व राज्य शासनाला याची मदत होणार आहे. निवृत्त कर्नल यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी प्रशिक्षित झालेले असतात. सैनिकी शाळेतील अनेक विद्यार्थी सैन्य दलात भरती झालेले असले तरी शेकडो विद्यार्थी हे सामान्य नागरिक तसेच अनेक ठिकाणी शिक्षण घेत आहेत. सैनिकी शाळांमधून 2010 नंतर बारावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थी ते ज्या ठिकाणी असतील त्यांनी त्या ठिकाणी ही सेवा देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्यात 42 सैनिकी शाळा
लष्करी दलात उच्च अधिकारी चा मराठी टक्का वाढावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 1996 च्या धोरणानुसार  प्रत्येक जिल्ह्यात एक सैनिकी शाळा स्थापन केल्या. सद्यस्थितीत 39 अनुदानित व 3 विनाअनुदानित अश्या 42 सैनिकी शाळा आहेत. यात मुलींच्या स्वतंत्र सैनिकी शाळांचा समावेश आहे. दरवर्षी या सैनिकी शाळांमधून बारावी उत्तीर्ण झालेले शेकडो विद्यार्थी बाहेर पडतात. त्यांना 5 वी पासून ते 12 वी पर्यंत च्या 8 वर्ष च्या कालावधीत विविध प्रकारचे लष्करी प्रशिक्षण दिलेले असते. आपत्ती व्यवस्थापनाबाबतचे धडे दिलेले असतात. त्यांच्या या ज्ञानाचा फायदा समाजाला होणार आहे. एकाबाजूला राज्यात करुणा चा प्रादुर्भाव वाढत आहे त्यासाठी सर्वच स्तरावरील नागरिक व सेवाभावी संस्था मदतीसाठी पुढे येत आहेत. इतर राज्यांमध्ये केंद्रशासित दोन-तीन सैनिकी शाळा आहेत मात्र राज्यात ही संख्या 42 आहे. त्यामुळे त्यातून शिक्षण घेतलेल्या योग्य मनुष्यबळाचा वापर या संकट समयी करता येणार आहे. 

अशी होईल मदत
बाहेरगावी कामानिमित्त गेलेले मुंबई व पुणे यासह अनेक मोठ्या शहरातील नागरिक आपल्या गावाकडे परतले आहेत. त्यांची माहिती प्रशासनाला कळविणे, त्यांना सक्तीने होम क्वारंटाईन करणे, त्यांना शिक्का मारणे, संशयित व्यक्तिबाबत माहिती देणे, किराणा दुकान भाजीपाला मार्केट या ठिकाणी नागरिकांच्या रांगा लावणे, रस्त्यावर वावरणाऱ्या नागरिकांचे ओळखपत्र तपासणे, गर्दी कमी करण्यासाठी त्यांची मदत होणार आहे. सैनिकी शाळा मध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी हे अनुशासन व स्वयंशिस्त प्रिय असतात त्यांच्या या स्वयंशिस्तीचा वापर या विविध कामासाठी होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner police department help Military school ex students