पावसाळ्यातही पाण्यासाठी नागरिकांची होतेय वणवण 

योगेश महाजन
रविवार, 24 जून 2018

अमळनेर : शहराचा पाणीपुरवठा गेल्या पंधरवड्यापासून विस्कळित झाला आहे. ऐन पावसाळ्यात नागरिकांची वणवण होत आहे. पालिका प्रशासनही हतबल असून, यास महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. 

अमळनेर : शहराचा पाणीपुरवठा गेल्या पंधरवड्यापासून विस्कळित झाला आहे. ऐन पावसाळ्यात नागरिकांची वणवण होत आहे. पालिका प्रशासनही हतबल असून, यास महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. 
अमळनेर शहरास तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत होत होता. मात्र, पंधरवड्यापासून हा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. तीन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा एका- दोन दिवसांनी लांबणीवर पडला आहे. परिणामी नागरिकांची पाण्यासाठी दमछाक होत आहे. विशेषतः: महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तांत्रिक अडचणींवर मात करून सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा काही नागरिकांनी दिला आहे. 

वरिष्ठांनी लक्ष घालावे 
कलाली येथील ट्रान्सफार्मरवरून अमळनेरचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. याच ट्रान्सफार्मवर कलाली व सात्रीच्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या मोटरही अवलंबून आहेत. एकाच वेळी दोन्हीकडे विद्युतपुरवठा सुरू असताना ओव्हरलोड झाल्यास ब्रेक डाऊन केला जातो. काही शेतकरीच त्यांच्या शेतात पाणी भरण्यासाठी अमळनेर पालिकेचा 'कट आउट' बंद करून टाकतात. त्यानंतर सुरू करण्यासही कोणी येत नाही. शुक्रवारी (ता. 22) सायंकाळी सहाला बंद झालेला वीजपुरवठा हा शनिवारी (ता. 24) सकाळी आठला सुरू करण्यात आला. यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यास मोठा व्यत्यय आला. याकडे संबंधित वायरमनचेही दुर्लक्ष असल्याने पालिका प्रशासनाकडून नाराजी व्यक्‍त होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. 
.... 

पालिकेकडून अमळनेर शहराला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी लाखो रुपये खर्च होतात. जळोद, कलाली, सात्री येथे लक्ष ठेवण्यासाठी 24 तास कर्मचाऱ्यांची नेमणूक आहे. मात्र, वीज कंपनीच्याच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षाने ही समस्या उद्भवली आहे. संबंधित वायरमनवर कारवाई होणे गरजेचे आहे. 
- पुष्पलता पाटील, नगराध्यक्षा, अमळनेर. 
 

पावसाळ्याचे दिवस असल्याने वारंवार तांत्रिक बिघाड होत आहे. याबाबत कर्मचाऱ्यांना दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले आहे. लवकरच तांत्रिक अडचणींवर मात करून सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कोणी कामचुकारपणा करत असेल तर, संबंधित कर्मचाऱ्यालाही याबाबत समज देण्यात येईल. 
- रवी नागदिवे, सहायक अभियंता, वीज कंपनी, अमळगाव कक्ष.

Web Title: marathi news amlner palika water supply