नाशिक - बागलाण तालुक्यात ढगाळ वातावरणाचा पिकांवर मोठा परिणाम

रोशन खैरनार
गुरुवार, 15 मार्च 2018

सटाणा : शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठवड्यात तालुक्यातील तळवाडे दिगर व आदिवासी पश्चिम पट्ट्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यात कोट्यावधींचे नुकसान झाले होते. तर आता ढगाळ वातावरण व हवामान खात्याने दिलेल्या पावसाच्या अंदाजामुळे पिकांवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे बळीराजा मोठय़ा चिंतेत सापडला आहे. 

सटाणा : शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठवड्यात तालुक्यातील तळवाडे दिगर व आदिवासी पश्चिम पट्ट्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यात कोट्यावधींचे नुकसान झाले होते. तर आता ढगाळ वातावरण व हवामान खात्याने दिलेल्या पावसाच्या अंदाजामुळे पिकांवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे बळीराजा मोठय़ा चिंतेत सापडला आहे. 

कांद्याचे आगार म्हणून 'कसमादे' या चार तालुक्यांची ओळख जगभर आहे. बागलाण तालुक्यात दरवर्षी कांद्याचे चांगले उत्पादन घेतले जाते. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड करण्यात आली आहे. मात्र गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात शेतातील उघड्यावर ठेवलेला कांदा भिजला. तालुक्यातील आदिवासी पश्चिम भागातील तळवाडे दिगर, मोरकुरे, पठावे, चिंचपाडा या परिसरातील पाऊसामुळे कांदा, भाजीपाल्यासह रब्बीतील गहू, हरभरा पिकांना याचा फटका बसला. अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबा मोहोर गळून पडले असून याचा थेट परिणाम कैरी व आंब्याच्या उत्पादनावर होणार आहे. तर या अवकाळी पावसामुळे कांदा, टोमटो, गहू, हरभरा यांच्यासह भाजीपाला पिकाच्या उत्पादनावर परिमाण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अवकाळी पावसानंतर आता तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे बळीराजा अस्मानी संकटात सापडला आहे.

येत्या दोन दिवसात राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे कांद्यासह भाजीपाला पिकावर करपा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकऱ्याना महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. चालू वर्षी खराब झालेल्या कांदा रोपामुळे उशिरा लागवड केलेल्या कांदा पिकावर करपा व भूरीने थैमान घातले आहे. 

अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. सर्दी, पडसे, खोकला यांसारखे आजार उद्भवू लागले आहेत. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे. सध्या दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यामुळे रात्रीच्या वेळी वातावरण दमट होऊ लागले आहे. त्यामुळे उकाडय़ाची जाणिव होत आहे. उकाडय़ापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना गारवा शोधावा लागत आहे. बाजारात काकडी, टरबूज, खरबूज या फळांना मागणी वाढली असून उसाचा रस, लिंबूपाणी, लस्सी व शीतपेय विक्रेत्यांनाही अच्छे दिन आले आहेत. सटाणा शहरात काल बुधवारी (ता.१४) कमाल ३६ तर किमान २० अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती.

Web Title: Marathi news baglan news rainy environment effects on crops