#BATTLE FOR DINDORI-गावितांची उमेदवारी अन्‌ चव्हाणांच्या संदिग्धतेमुळे  राष्ट्रवादी,भाजपची अडचण

residentional photo
residentional photo

    मालेगाव लोकसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन 2009 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात आताच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. दिंडोरीतील मतांवर प्रभाव टाकणारे कळवण- सुरगाण्याचे आमदार जे. पी. गावित यांनी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्याच वेळी भारतीय जनता पक्षाप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारीची भाकर फिरविली. त्यातच, नाराज असलेले खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांची भूमिका अद्याप संदिग्ध आहे. अशा साऱ्या परिस्थितीत हा मतदारसंघ आपल्याकडे राखण्यासाठी सरसावलेल्या भाजपप्रमाणे या मतदारसंघावर कब्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढे दिंडोरीमधून मताधिक्‍य मिळविण्याबद्दलचे प्रश्‍नचिन्ह कायम आहे. 

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायचे होते. त्या वेळी शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठकीत यंदा दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी लोकसभा, तर पेठचे जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याचे ठरले. युतीमधील बेनावामुळे दोघांचा हुरूप वाढला होता. पण निवडणुकीचा बिगुल फुंकण्याच्या अगोदरच्या राजकीय हालचालींचा कानोसा घेत याहीवेळी युती होणार म्हटल्यावर महालेंनी शिवसेनेला "जय महाराष्ट्र' करत राष्ट्रवादीच्या गोटात सामील होण्याचा निर्णय घेतला. महालेंच्या पक्षप्रवेशाला माजी मंत्री (कै.) ए. टी. पवार यांच्या कुटुंबातील भाऊबंदकी मिटत नसल्याची बाब कारणीभूत ठरली. पक्षात प्रवेश करताच,

  महालेंनी थेट विधानसभा मतदारसंघनिहाय राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. याच दरम्यान भाजपच्या नेत्यांकडून उमेदवार बदलण्याचे संकेत नव्हे, तर खात्री मिळताच, दिंडोरी लोकसभेची मागील निवडणूक लढविलेल्या राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार भाजपमध्ये दाखल झाल्या आणि त्याच दिवशी रात्री त्यांची उमेदवारी जाहीर झाली. या साऱ्या राजकीय कोलांटउड्यांच्या पार्श्‍वभूमीवर लोकसभेतील प्रतिनिधित्वाची हॅट्ट्रिक करणारे खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली नाराजी प्रकट करत पालकमंत्री गिरीश महाजन यांना घेरले. त्यानंतर त्यांचा आणि त्यांची पत्नी डॉ. कलावती चव्हाण यांच्यासाठी असे दोन उमेदवारी अर्ज नेण्यात आले.

   जळगावचा उमेदवार बदलण्याची आणि त्यापाठोपाठ नंदुरबारमधील बंडखोरीची नामुष्की पत्करावी लागलेल्या भाजपकडून काही वेगळा निर्णय होतोय काय, याकडे चव्हाणांचे समर्थक डोळे लावून बसले आहेत. त्याच वेळी चव्हाणांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री मधुकर पिचड यांची मुंबईत रुग्णालयात जाऊन भेट घेत राजकीय आखाडा तापविला आहे. हे सारे घडत असताना दिंडोरीमधील राजकीय अस्वस्थता थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. दिंडोरीचे विधानसभेत दोनदा प्रतिनिधित्व केलेले कॉंग्रेसचे माजी आमदार रामदास चारोस्कर राजकीय कूस बदलण्याच्या मूडमध्ये आहेत. त्यांची ही तयारी आगामी विधानसभेच्या दृष्टीने असून, महालेंची शिवसेनेतील पोकळी भरून काढण्याच्या काहीशा मनःस्थितीत ते आहेत. जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात त्यांनी यापूर्वी कॉंग्रेसविरोधात दंड थोपटून स्वतःच्या पत्नीला सभापतिपद मिळवून दिले आहे. 


चांदवड पॅटर्न पुनरावृत्तीची खेळी 
कादवा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राच्या माध्यमातून दिंडोरी आणि चांदवड एकमेकांशी सांधला गेला आहे. या कारखान्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत चांदवडमधून शिवसेनेचे उत्तमबाबा भालेराव यांना राष्ट्रवादीत आणून आमदार केले होते. त्या वेळी भालेरावांना शिवसेनेची छुपी मदत झाली होती. याच पॅटर्नची पुनरावृत्ती करण्याची खेळी राष्ट्रवादीने केली असली, तरीही शिवसेनेतील काही मराठा समाजातील नेत्यांचा अपवाद वगळता इतरांची महालेंना कितपत छुपी मदत होणार यावर दिंडोरीमधील मताधिक्‍याचे गणित अवलंबून असेल. त्यातच, राष्ट्रवादीच्या पराभवाला कारणीभूत ठरलेले जे. पी. गावित यांचा रोख दिंडोरीवर असणार हे स्पष्ट आहे. शिवाय चारोस्करांच्या रूपाने तयार होणाऱ्या नाराजीत आदिवासी समाजातील जातीय समीकरणे जुळविण्याचे आव्हान शेटे यांच्याप्रमाणे दिंडोरीचे राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्यापुढे असेल. 


2009 मधील लोकसभा निवडणूक 
- भाजपचे हरिश्‍चंद्र चव्हाण (विजयी) ः 2 लाख 81 हजार 254 मते (41.16 टक्के) 
- राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ (पराभूत) ः 2 लाख 43 हजार 907 मते (35.78 टक्के) 
(झिरवाळांचा 37 हजार मतांनी पराभव अन्‌ माकपच्या जे. पी. गावितांनी मिळविली एक लाखाहून अधिक मते) 
0 दिंडोरी विधानसभा मतदारसंघाची स्थिती 
हरिश्‍चंद्र चव्हाण ः 44 हजार 895 मते 
नरहरी झिरवाळ ः 62 हजार 610 मते 
जे. पी. गावित ः 28 हजार 663 मते 
(झिरवाळांनी चव्हाणांच्या विरोधात घेतली 17 हजार मताधिक्‍याची आघाडी) 

 
2014 मधील लोकसभा निवडणूक 
- भाजपचे हरिश्‍चंद्र चव्हाण (विजयी) ः 5 लाख 42 हजार 784 मते (55.94 टक्के) 
- राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार (पराभूत) ः 2 लाख 95 हजार 165 मते (35.78 टक्के) 
(डॉ. पवारांचा दोन लाख 47 हजार मताधिक्‍यांनी पराभव अन्‌ माकपच्या हेमंत वाघेरेंना मिळाली 72 हजार 599 मते) 

0 दिंडोरी विधानसभा मतदारसंघाची स्थिती 
हरिश्‍चंद्र चव्हाण ः 76 हजार 704 मते 
डॉ. भारती पवार ः 73 हजार 707 मते 
हेमंत वाघेरे ः 18 हजार 278 मते 
(चव्हाणांनी डॉ. पवारांच्याविरोधात घेतली दोन हजार 977 मतांची आघाडी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com