#BATTLE FOR NASHIK नाशिकच्या सायकलस्वाराची इंडियागेट येथे मतदार जागरूकतेची गुढी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

नाशिक, : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सहा सायकलस्वारांनी मतदानविषयक जागरूकतेचा संदेश देण्यासाठी मुंबई ते दिल्ली हा एक हजार 440 किलोमीटरचा प्रवास 72 तासांत पूर्ण करत गुढीपाडव्याच्या दिवशी राजधानीतील ऐतिहासिक इंडिया गेट येथे गुढी उभारली. 

नाशिक, : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सहा सायकलस्वारांनी मतदानविषयक जागरूकतेचा संदेश देण्यासाठी मुंबई ते दिल्ली हा एक हजार 440 किलोमीटरचा प्रवास 72 तासांत पूर्ण करत गुढीपाडव्याच्या दिवशी राजधानीतील ऐतिहासिक इंडिया गेट येथे गुढी उभारली. 

निवडणुकीत मतदार जागरूकतेसाठी नाशिक सायकलिस्टच्या सायकलस्वारांनी मुंबई ते दिल्ली असा प्रवास पूर्ण केला. 3 ते 6 एप्रिलदरम्यान या सायकलस्वारांनी प्रवास पूर्ण केला आहे. चंद्रकांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम पवार, मोहन देसाई, राजेंद्र गुंजाळ, रवींद्र दुसाने आणि प्रथमच मतदानात सहभागी होण्यास उत्सुक असलेला 18 वर्षांचा पूर्वांश लखलानी या नाशिक सायलिस्टच्या सायकलस्वारांनी सहभाग घेत मुंबईहून सुरू झालेल्या प्रवासात वापी (गुजरात), सुरत (गुजरात), ब्यावर (राजस्थान) या ठिकाणी मतदार जागरूकतेचा कार्यक्रम घेऊन या सायकलस्वारांनी मतदानासाठी आवाहन करीत, लोकांना मतदानाची प्रतिज्ञाही दिली. मतदान करा आणि आपला अधिकार बजावा, असे संदेश या सायकलस्वारांच्या सायकलींवर लिहिण्यात आले होते. 

3 एप्रिलला प्रारंभ 
मुंबईचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे, उपजिल्हाधिकारी बाळासाहेब वाकचौरे आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी तथा नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरीश बैजल यांनी 3 एप्रिलला सकाळी साडेसातला मुंबई येथील हुतात्मा चौकात या सायकलस्वारांना हिरवा झेंडा दाखविला. नाशिकला तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सायकलस्वारांनी दिल्लीतील इंडियागेटपर्यंत महाराष्ट्रात सर्वांत कमी मतदानाची नोंद असलेल्या दक्षिण-मुंबई लोकसभा मतदारसंघातून सायकल प्रवासाला सुरवात करण्याचे ठरविले. 

रोज 480 किलोमीटरचा प्रवास 
सायकलस्वारांनी रिले प्रकारानुसार एका वेळी दोन चालक या प्रकारे प्रवास केला. ताशी 20 किलोमीटरप्रमाणे दिवसाला (24 तासांत) 480 किलोमीटर त्यांनी दिवस व रात्र असा प्रवास केला. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाना आणि उत्तर प्रदेश या राज्यांतून एकूण एक हजार 440 किलोमीटरचा प्रवास 72 तासांत पूर्ण केला. सध्या उन्हाळा असल्याने प्रवासात दररोज एक सायकल किमान तीन वेळा पंक्‍चर होत असे. जयपूर येथे सोसाट्याचा वारा व गारपिटीसह झालेला पाऊस अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामनाही या सायकलस्वारांनी केला. अखेर शनिवारी (ता. 6) गुढीपाडव्याला दिल्लीतील इंडिया गेटवर सकाळी साडेसातला सायकस्वार पोचले व त्यांनी येथे गुढी उभारून या प्रवासाची सांगता केली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सायकलस्वारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  
--------------------

Web Title: marathi news BATTLE FOR NASHIK