माजी आमदार संतोष चौधरींचा राष्ट्रवादीत प्रवेश

live photo
live photo

भुसावळ : भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी आज दुपारी मुंबई येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. भुसावळचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतोष चौधरी यांची आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर ही घरवापसी मानली जात आहे. संतोष चौधरी यांची रावेर लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे प्रबळ दावेदारी मानली जात आहे. 
अठ्ठावीस वर्षांपासून भुसावळच्या राजकारणात किंग वा कधी किंग मेकरच्या भुमिकेत राहाणारे संतोष चौधरी हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे वृत्त "सकाळ' ने काही महिन्यांपुर्वी ठळकपणे प्रकाशित केले होते. त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादी कॉंग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे. कट्टर शिवसैनिक म्हणून आपल्या राजकारणाची सुरवात करणाऱ्या संतोष चौधरींचा राजकीय प्रवास अपक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, जनआधार विकास पार्टी आणि पुन्हा आता राष्ट्रवादी कॉंग्रेस असा झाला आहे.
आमदार म्हणून निवडून आल्यानंतर संतोष चौधरींनी आपल्या कामांनी जिल्हाभर प्रभाव निर्माण केला होता त्यामुळे तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे सरकार असताना मंत्रीपद मिळावे म्हणून भरपूर प्रयत्न केले पण, मंत्रीपदाने हुलकावणी दिली. नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष, आमदारकीपर्यंतच्या संतोष चौधरींच्या धडकाकेबाज कारकीर्दीला वादाची किनार राहिली आहे. 
2016मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीपासून ते पुन्हा पडद्यामागून सक्रीय झाले आणि जनआधार विकास पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवून 19 जागा जिंकून आणल्या. विरोध पक्ष म्हणून पालिकेत काम करणाऱ्या जनआधारच्या सदस्यांनी सत्ताधाऱ्यांना अनेक वेळा धारेवर धरले आहे. 
अशा परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील पक्ष प्रवेशाने भुसावळ विभागात ते स्वत: आणि पक्षाला बळ मिळाले आहे. कार्यकर्त्यांवरील घट्ट पकड, वेळप्रसंगी दोन हात करण्याची तयारी, संकट अंगावर घेण्याही हिंमत आणि कामांसाठी झोकून देण्याचा आक्रमक स्वभाव अशा पैलुंमुळे आगामी निवडणुकांमध्ये जबरदस्त चुरस निर्माण होणार आहे. भाजपला तापी परिसरात लढाई सोपी नाही असे चित्र निर्माण होऊ पाहात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com