जिल्ह्याच्या प्रदूषणात ७० टक्क्यांनी घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pollution

लॉकडाऊनमुळे शहारातील हवा शुद्ध झाली आहे. कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायआक्साईड या घातक वायूंचे प्रमाण कमी झाल्याने वातावरण स्वच्छ झाले असून हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषणात सरासरी ७० टक्क्यांनी घट झाली आहे. हा स्तर खूप आरोग्यदायी मनाला जातो. प्रदूषण व वातावरणात धूलिकण घटल्याने दृश्यमानतेत मोठी वाढ झाली आहे.
- निलेश गोरे, हवामान तज्ञ.

जिल्ह्याच्या प्रदूषणात ७० टक्क्यांनी घट

भुसावळ : देशभरात कोरोनाचे संकट अधिकच गडद होत असताना, धास्तावलेल्या जिल्हावासियांसाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील प्रदूषणात पहिल्यांदाच थोडीफार नव्हे तर ७० टक्क्यांपर्यंत घट आली आहे, तर ऑक्सिजनचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एरवी शुद्ध हवेसाठी निसर्गाच्या सान्निध्यात जाणाऱ्या नागरिकांना आता घरातल्या घरातच शुद्ध हवा मिळत आहे. कोरोनामुळे सर्व नागरिक घरातच असल्याने कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी मदत होत असताना दुसरीकडे काही दिवसांकरिता तरी प्रदूषण कमी झाल्याचे चित्र आहे.

हेपण वाचा - Video जिल्ह्यात अवकाळी पाऊस नाही, तापमानवाढीचा मात्र धोका! 


कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी अगोदर जमावबंदी व आता १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यामुळे सर्व प्रकारची सार्वजनिक आणि खासगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही ठप्प आहे. परिणामी, रस्त्यांवर प्रचंड शुकशुकाट दिसून येत आहे. यामुळे वायुप्रदूषणाची पातळी झपाट्याने कमी झाली आहे. अनेक उद्योग, धंदे बंद असल्याने कच्च्या मालाच्या होणाऱ्या पुरवठ्यासाठीची वाहतूकही बंद आहे. वाहतूक बंद असल्याने गाड्यांचा धूर, धुळही कमी झाला आहे.

मोजणीचे निकष
हवेतील प्रदूषण मोजण्यासाठी धूलिकण, सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइडचे मोजमाप केले जाते. सध्या नायट्रोजन ऑक्साइड २०.९७ मायक्रोगॅम प्रति घनमीटर, धूलिकण पीएम २.५= ३६.८, पीएम १०=४०.८४, सल्फर डायऑक्साइड ८.९२ तर कार्बन मोनॉक्साईड ४००.० मायक्रोगॅम प्रति घनमीटर ऐवढे आहे. कार्बन मोनॉक्साईड वगळता सर्व वायूचे स्तर व धुळीकणांचे स्तर समाधानकारक आहेत. लॉकडाउन पूर्वी प्रदूषणाचा स्तर २५० ते २६० अंकावर होता. जनता कर्फ्युच्या वेळेस तो घसरून १४०वर आला. लॉक डाऊन सुरू झाल्यानंतर हा स्तर ३२ ते ५५ वर येऊन ठेपला आहे. जळगाव शहराचा स्तर देखील २९० वरून ५५ वर आला आहे.

टॅग्स :Jalgaon