वीज उत्पादन क्षमतेत दीपनगर राज्यात प्रथम
भुसावळ ः येथील दीपनगर वीज निर्मिती केंद्राने स्थापित क्षमतेच्या सरासरीत वीज निर्मिती करत उत्तम भारांक गाठून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला; तर संपूर्ण देशातील वीज निर्मिती केंद्रांत 17 वे स्थान मिळविले आहे. एप्रिल महिन्यात या निर्मिती केंद्राचा भारांक 91.69 टक्के होता.
भुसावळ ः येथील दीपनगर वीज निर्मिती केंद्राने स्थापित क्षमतेच्या सरासरीत वीज निर्मिती करत उत्तम भारांक गाठून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला; तर संपूर्ण देशातील वीज निर्मिती केंद्रांत 17 वे स्थान मिळविले आहे. एप्रिल महिन्यात या निर्मिती केंद्राचा भारांक 91.69 टक्के होता.
दीपनगर केंद्राचे मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांच्या कुशल नेतृत्वाखाली एक हजार दोनशे दहा मेगावॉट स्थापित क्षमता असलेल्या या विद्युत केंद्राची एप्रिल 2018 मधील कामगिरी राज्यातील महानिर्मितीच्या सर्व विद्युत केंद्रांमधून "प्रथम' क्रमांकाची ठरली आहे. या महिन्यात स्थापित क्षमतेच्या 91.69 टक्के वीजनिर्मिती महिन्याभरात झाली. यात कार्यरत संच एकदाही बंद पडले नव्हते. विशेष म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील उत्तम भारांक श्रेणीत महानिर्मितीच्या भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राने सतराव्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे.
या कामगिरीबद्दल भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचे सर्व अधिकारी, अभियंते, कर्मचारी, संघटना प्रतिनिधी,कंत्राटदार, कंत्राटी कामगार यांचे महानिर्मितीचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी, संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, कार्यकारी संचालक(सं व सु ) व कैलाश चिरूटकर व राजू बुरडे यांनी विशेष अभिनंदन केले.
वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत परिणामकारक ठरणाऱ्या विविध घटकांवर सुनियोजित पद्धतीने परिश्रम घेतल्याने महत्तम कार्यक्षमता गाठण्यात दीपनगर वीज केंद्राला हे यश प्राप्त झाले. शिवाय मुख्यालयातील वरिष्ठ व्यवस्थापनाचे मार्गदर्शन व महानिर्मिती टीम भुसावळच्या सांघिक परिश्रमाची ही पावती आहे. भविष्यातही टिमवर्कच्या माध्यमातून अशीच प्रगती भुसावळ केंद्र गाठत राहील ही अपेक्षा आहे.
- राजेंद्र बावस्कर मुख्य अभियंता, भुसावळ वीज निर्मिती केंद्र, भुसावळ (दीपनगर)