स्थायी सभापतिपदावरून भाजपमध्ये नाराजीचे फटाके

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

नाशिक - भारतीय जनता पक्षाने स्थायी समितीवर नऊ सदस्यांपैकी सात महिला सदस्य पाठविल्यानंतर सभापतिपदासाठी महिलेलाच उमेदवारी दिल्याने दिनकर पाटील व उद्धव निमसे यांचा संतापाचा बांध फुटला असून, भाजपमध्ये नाराजीचे फटाके वाजण्यास सुरवात झाली आहे. निमसे व पाटील दोघांनीही पक्षाने घेतलेला निर्णय मान्य असल्याची प्रतिक्रिया दिली असली तरी गुरुवारी दिवसभर रामायण व गटनेता कार्यालयात दोघांची समजूत काढताना पदाधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले. 

भाजपमध्ये स्थायी समिती सभापती पदासाठी अनेक जण इच्छुक होते. त्यातील शशिकांत जाधव, अलका आहिरे चिठ्ठी पद्धतीतून बाद झाल्याने त्यांची दावेदारी संपुष्टात आली. त्यानंतर गटनेते संभाजी मोरुस्कर यांच्यासह कमलेश बोडके, उद्धव निमसे व दिनकर पाटील सभापतिपदासाठी दावेदार होते. मोरुस्कर व बोडके यांना सदस्यत्व न मिळाल्याने त्यांचीही दावेदारी संपुष्टात आली. दिनकर पाटील यांनी सभापतिपद मिळत असेल तरच सदस्य होतो; अन्यथा सभागृह नेते पदावर खूश असल्याची पक्षश्रेष्ठींकडे भावना व्यक्त केली होती. त्याचबरोबर उद्धव निमसे यांनाही सभापतिपदावर विराजमान होण्याचा शब्द दिला होता. परंतु आज अर्ज दाखल करताना हिमगौरी आडके यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला. सभापतिपदासाठीची दावेदारी संपुष्टात आल्याने नाराजीचे फटाके महापौर बंगल्यावर फुटले. अर्ज दाखल झाल्यानंतर पाटील व निमसे यांनी थेट ‘रामायण’ गाठत नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जाते. पाटील यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करताना रामायण बंगल्यावरून काढता पाय घेत त्यांचे कार्यालय गाठले. सभापतिपदाच्या शर्यतीतून पत्ता कट झाल्याने राजीनामाअस्त्र बाहेर काढल्याचे वृत्त पाटील व निमसे दोघांनीही खोडून काढले. पक्ष सांगेल त्याप्रमाणे निर्णय घेतल्याचे दोघांचे म्हणणे असले तरी सायंकाळपर्यंत भाजपचे गटनेते मोरुस्कर यांच्या कार्यालयात स्थायी समितीच्या सदस्यांकडून निमसे व पाटील यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. सभापतिपदाची निवडणूक शांततेत होऊ द्या, त्यानंतर बघू असा सल्ला देण्यात आल्याचे समजते.

भाजपमध्ये घराणेशाही
सभापतिपदाच्या उमेदवार हिमगौरी आडके आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या चुलत बहीण असल्याने भाजपमध्ये घराणेशाही वाढत असल्याचा आरोप नगरसेवकांनी खासगीत केला. उपमहापौर प्रथमेश गिते, नगरसेवक मच्छिंद्र सानप व योगेश हिरे तसेच स्वीकृत नगरसेवकपदी अजिंक्‍य साने यांची वर्णी लागल्याचे उदाहरणे घराणेशाहीचा आरोप करताना दिली जात आहेत.

Web Title: marathi news bjp nashik news