वर्षभरात वीस ब्लॅक स्पॉटने घेतले 59 बळी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

नाशिक : गेल्या वर्षात (2017) शहरातील अपघाती घटनांत मृत्युमुखींच्या संख्येत घट झाली. ही बाब सुखावह असली, तरी अपघातप्रवण क्षेत्र असलेल्या ठिकाणी याच वर्षभरात 59 जणांचा बळी गेला आहे. सर्वाधिक 21 बळी मुंबई- आग्रा महामार्गावरील शहर हद्दीत गेले, तर नाशिक- पुणे महामार्गावरील शिंदे गाव या एकाच ठिकाणी झालेल्या वर्षभरातील अपघातांत दहा जणांचा बळी गेला आहे. 

नाशिक : गेल्या वर्षात (2017) शहरातील अपघाती घटनांत मृत्युमुखींच्या संख्येत घट झाली. ही बाब सुखावह असली, तरी अपघातप्रवण क्षेत्र असलेल्या ठिकाणी याच वर्षभरात 59 जणांचा बळी गेला आहे. सर्वाधिक 21 बळी मुंबई- आग्रा महामार्गावरील शहर हद्दीत गेले, तर नाशिक- पुणे महामार्गावरील शिंदे गाव या एकाच ठिकाणी झालेल्या वर्षभरातील अपघातांत दहा जणांचा बळी गेला आहे. 

राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग वा अन्य मार्गावर 500 मीटरच्या क्षेत्रात गत तीन वर्षांच्या कालावधीत झालेल्या अपघातांमध्ये पाच बळी वा गंभीर अपघात झाले असतील, अथवा दहा जण जखमी झाले असतील, तर त्या महामार्गावरील त्या ठिकाणांना अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) म्हणून नोंद केली जाते. नाशिक शहर हद्दीतून राष्ट्रीय मुंबई- आग्रा महामार्ग, नाशिक- पुणे महामार्ग, तर नाशिक- औरंगाबाद राज्य मार्ग, असे तीन मोठे महामार्ग जातात. या शिवाय त्र्यंबक रोड, पेठ रोड, दिंडोरी रोड, जुना आग्रा महामार्ग, असेही रस्ते आहेत. ज्या ठिकाणी अपघात नेहमीच होतात, त्या मार्गावर 20 अपघातप्रवण ठिकाण (ब्लॅक स्पॉट) आहेत. 

गेल्या वर्षभरात महामार्गांसह राज्य मार्ग व अंतर्गत मार्गांवर भीषण स्वरूपाचे अपघात झाले आहेत. यात सर्वाधिक अपघात मुंबई- आग्रा या महामार्गावर झाले असून, यात 21 जणांचा बळी गेलाय. विशेषत: या महामार्गावरील रासबिहारी चौफुली या ठिकाणी सर्वाधिक सहा जणांचा बळी, तर आडगाव येथील ट्रक टर्मिनल येथे पाच बळी गेले आहेत. याच महामार्गावरील सर्वाधिक धोकादायक जागा म्हणून के. के. वाघ महाविद्यालय चौफुलीची नोंद असून, या ठिकाणी तिघांचा बळी गेला. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून येथील चौफुली वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील अपघातांना आळा बसला. नाशिक- पुणे महामार्गावरील शिंदे गाव येथे गतवर्षी दहा जणांचा बळी, तर फेम सिग्नल येथे चौघांचा बळी गेला आहे. 
------------------------ 
वेगाचे 18 बळी 
भरधाव वाहन चालविणे ही वाहनचालकांसाठी पॅशन झाली आहे; परंतु याच वेगात वाहन चालविल्याने 18 जणांचा बळी गेला आहे. यात फेम सिग्नलवर चार अपघाती बळींचा समावेश आहे. वेगाची मर्यादा ओलांडल्यामुळे 18 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 
---------- 

उपाययोजनेसाठी समिती 
महामार्गावर एखाद्या वळणावर सातत्याने अपघात होत असतील, तर त्या ठिकाणी अपघाताला आळा घालण्यासाठीची ठोस उपाययोजना करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. या समितीत राष्ट्रीय महामार्ग, पोलिस आयुक्त वा पोलिस अधीक्षक, स्थानिक पोलिस निरीक्षक, वाहतूक पोलिस शाखेचे अधिकारी, महापालिका वा ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा समावेश असतो. या समितीमार्फत अपघाताला आळा घालण्यासाठीच्या उपाययोजना करण्याचा अधिकार असतो. 

 

Web Title: marathi news black spot