सोनसाखळी चोरी करणारी इराणी टोळी जेरबंद 

residenational photo
residenational photo

नाशिक: शहरात दुचाकीवरून येऊन एकामागोमाग एक असा सोनसाखळ्या ओरबाडायच्या अन्‌ शहराबाहेर थांबलेल्या चारचाकीतील साथीदारांकडे जायचे. चारचाकीतील साथीदार दुचाक्‍या घेऊन मार्गस्थ व्हायचे तर सोनसाखळ्या ओरबाडणारे चोरटे चारचाकीतून पसार व्हायचे... यामुळे दुचाकीवरून आलेल्या संशयितांची ओळख पटविणे पोलिसांना मुश्‍किल तर व्हायचे, शिवाय पोलिसांचीही दिशाभूल करणारी ही "मोडस्‌' वापरून संशयित गुन्हे करणाऱ्या चौघांना नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने दौंड येथून अटक केली. सदरच्या गुन्ह्यातून पहिल्यांदाच इराणी चोरट्यांनी इतरांना सामावून घेत गुन्हे करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 
 
कंबर रहिम मिर्झा (30), सादीक शमल खान (25), जफर मुख्तार शेख (27, सर्व रा.श्रीरामपूर, जि.अहमदनगर), गुलामअली सरताज जाफरी (35, रा. आंबीवली,ता. कल्याण, जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या चौघा सोनसाखळी चोरट्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी यांना सोलापूरहून नाशिककडे सोनसाखळी चोरट्यांची एक टोळी येत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, महेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली एक पथक सोलापूरला पोहोचले. तेथून दौंडकडे निघालेल्या धावत्या रेल्वेमध्ये साध्या वेशातील पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला असता, दौंड येथे चौघांना शिताफीने अटक केली. 

चारही संशयित नुकतेच केरळमध्ये सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये एक वर्षांची शिक्षा भोगून आलेले होते. त्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये मुंबईनाका हद्दीत 2, अंबड हद्दीत 1, इंदिरानगर हद्दीत 4, उपनगर हद्दीत 1 तर भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 1 असे 9 तर ठाण्यातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 1 अशा अकरा गुन्ह्यांची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलीसांनी संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची पल्सर दुचाकी व 210.48 ग्रॅम सोन्याची लगड असा 6 लाख 69 हजार 344 रुपयांची मुद्देमाल जप्त केला. सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, हवालदार वसंत पांडव, विशाल काठे, विशाल देवरे, स्वप्निल जुंद्रे, राहुल पालखेडे, शांताराम महाले, प्रवीण चव्हाण, दीपक जठार यांच्या पथकाने बजावली. 
 
असे करायचे दिशाभूल 
एखाद्या शहरात दाखल होण्यापूर्वी दोघे दुचाकीवरून तर दोघे चारचाकीतून शहराच्या बाहेर यायचे. दुचाकीवरून दोघे शहरात येऊन दोन-चार सोनसाखळ्या खेचून चारचाकी थांबलेल्या ठिकाणी पोहोचायचे. त्याठिकाणी दुचाकीची नंबरप्लेट बदलून चारचाकीतील दोघे दुचाकीवरून मार्गस्थ व्हायचे तर चोरटे चारचाकीतून. त्यामुळे वर्णनावरून पोलिसांनी दुचाकी पकडली तरी संशयितांचे वर्णन न मिळाल्याने ते सुटायचे आणि पोलिसांची दिशाभूल व्हायची. 
 

गाड्यांचा वापर भाड्याने 
गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या या भाड्याने घेतल्या जायच्या. त्यासाठी प्रथम इराणी चोरट्यांनी दुसऱ्यांचा आधार घेतला. दुचाकी घेऊन आलेल्यांना इराणी चोरट्यांकडून 1 हजार रुपये रोज दिला जायचा. ज्यामुळे ते ज्या शहरात जायचे तेथे दुचाक्‍यांचा वापर करून संबंधिताला मोबदला द्यायचे. त्यामुळे पोलिसांची दिशाभूल होईल इराणी चोरटे गुन्हा करून पसार होत होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com