होमक्‍वारंटाईन असताना प्रवास करणारे १३ जण ताब्‍यात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 March 2020

राजस्थानातील काही मजुर कर्नाटक येथे काम करीत होते. कारोना व्हायरस रूग्णांच्या संपर्कात आल्याची शक्‍यता गृहीत धरून या १३ मजुरांना होम क्वारंटटाईन करण्याचा सल्ला देण्यात आला होता.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) - कर्नाटकमध्ये कामाला गेलेले १३ मजुर होमक्वारंटाईनचा हातावर शिक्का असूनही एका खाजगी वाहनाने राजस्थानकडे पळून जात असतांना चाळीसगाव-धुळे रस्त्यावरील तरवाडे बारीजवळ आज दुपारी पकडले. आरटीओ विभागाने ही कारवाई केली. या सर्व मजुरांना शहरातील राष्ट्रीय महाविद्यालयात हलविण्यात आले असून तेथे त्यांना १४ दिवस निगरानीत ठेवण्यात येणार आहे. 
राजस्थानातील काही मजुर कर्नाटक येथे काम करीत होते. कारोना व्हायरस रूग्णांच्या संपर्कात आल्याची शक्‍यता गृहीत धरून या १३ मजुरांना होम क्वारंटटाईन करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र हे मजुर सर्वांची नजर चुकवून आपल्या गावी राजस्थान येथे के.04 एसी.1596 या वाहनातून ते जात असतांना आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास चाळीसगाव-धुळे रस्त्यावर तरवाडे बारीजवळ आरटीओ विभागाचे अधिकारी श्री.झाडे व श्री.महाले तसेच मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रताप मथुरे व होमगार्ड सागर पाटील यांनी नाकबंदी दरम्‍यान हे वाहन पकडले. त्यात १२ पुरुष १ महिला असे १३ जण मिळून आले. संबंधीत अधिकाऱ्यांनी या वाहनासह सर्व मजुरांना चाळीसगाव तहसील कार्यालयात हजर करण्यात येवून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या मजुरांना शहरातील राष्ट्रीय महाविद्यालयात तयार केलेल्या विशेष कक्षात ठेवण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर १४ दिवस निगरानी करण्यात येणार आहे. या मजुरांच्या हातावर होम क्वारंटटाईनचे शिक्के असतांना देखील ते कर्नाटकातून पळून कसे आले याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

काय आहे होम क्वारंटटाईन? 
ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत पण ज्यांची टेस्ट निगेटीव्ह आहे. म्हणजे कोरोनाच्या व्हायरसने शरीरात एन्ट्री केली आहे की नाही हे नक्की माहीत नाही अशा लोकांना होम क्वारंटटाईनकेले जाते. अशांना हॉस्पीटलमध्ये थांबायचे नसेल तर त्यांनी घरीच थांबावे आणि इतरांशी संपर्क बंद करावा असे सांगितले जाते.म्हणजे हा व्हायरस पसरणार नाही याचा अर्थ आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon corona home quarantine 13 people travling