चाळीसगावात सुरू होणार कापूस खरेदी केंद्र 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन घेतले जाते. ‘लॉकडाउन’मुळे कापसाच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने व शासनाची हमीभावाने कापूस खरेदी केंद्रे बंद असल्याने बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर कापूस पडून आहे.

चाळीसगाव : तालुक्यात ‘सीसीआय’चे कापूस खरेदी केंद्र अद्यापपर्यंत सुरू झालेले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात कापूस विकावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार मंगेश चव्हाण यांनी संबंधित यंत्रणेशी पाठपुरावा केल्याने अखेर कापूस खरेदी केंद्र सुरू होत आहे. शेतकऱ्यांना या ठिकाणी कापूस आणण्यापूर्वी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मोबाईलवर नाव नोंदणी करावी लागणार आहे. शासकीय हमीभावाचे कापूस खरेदी केंद्र सुरू होत असल्याने तालुक्यातील कापूस उत्पादकांनी आमदार चव्हाण यांचे आभार मानले आहेत. 
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन घेतले जाते. ‘लॉकडाउन’मुळे कापसाच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने व शासनाची हमीभावाने कापूस खरेदी केंद्रे बंद असल्याने बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणावर कापूस पडून आहे. ज्यांना पैशांची नितांत गरज होती, अशा शेतकऱ्यांनी कमी दरात नाइलाजाने कापूस विकला. घरात कापूस पडून असल्याने त्यात पिसे पडत असल्याने शेतकऱ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. ‘लॉकडाउन’ शिथिल झाल्यानंतर धुळे रस्त्यावरील सत्यम कोटेक्स प्रायव्हेट लिमिटेड येथे मान्यता मिळालेले ‘सीसीआय’चे कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. मात्र, या खरेदी केंद्रावर मजूर उपलब्ध होत नसल्याने तसेच शासनाच्या नियमाप्रमाणे एप्रिल व मे महिन्यासाठी कापसाच्या दर्जाबाबत असलेल्या अटी व शर्तींमुळे सत्यम कोटेक्सतर्फे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास टाळाटाळ केली जात होती. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ही बाब आमदार मंगेश चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली असता, त्यांनी तत्काळ भारतीय कपास निगमचे केंद्र प्रमुख जे. पी. सिंग यांची बैठक बोलावून माहिती जाणून घेतली. खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत येणाऱ्या अडचणींबाबत भारतीय कपास निगम लिमिटेडचे औरंगाबाद येथील महाप्रबंधकांना पत्र देऊन सूचना केल्या होत्या. याशिवाय पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजीमंत्री गिरीश महाजन यांच्याकडेही पाठपुरावा सुरू ठेवला होता. जळगाव येथे कोरोनासंदर्भात उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांची आमदार मंगेश चव्हाण यांनी मागील आठवड्यात भेट घेतली असता, त्यावेळी देखील चाळीसगावच्या कापूस खरेदी केंद्राबाबत लक्ष द्यावे, अशी विनंती केली होती. अखेर या सर्व पाठपुराव्याला यश आले असून ‘सीसीआय’तर्फे सत्यम कोटेक्स येथे कापूस खरेदी सुरू करण्यात येणार आहे. 

सोमवारपासून होणार नोंदणी 
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ९५६१३६९४०६ या मोबाईल क्रमांकावर फोन करून शेतकऱ्यांच्या नाव नोंदणीला सुरुवात केली जाणार आहे. सोमवारपासून (११ मे) ही नोंदणी सुरू होईल. नाव नोंदणीसाठी कोणीही बाजार समितीत येऊ नये, असे आवाहन बाजार समितीने केले आहे. खरेदी केंद्राच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी २०१९-२० चा कापूस पीकपेरा असलेला व तलाठी यांचा सहीशिक्का असलेला सातबारा उतारा, शेतकऱ्याच्या बँक पासबुक झेरॉक्स ज्यात बँकेचा ‘आयएफसीएस’ कोड असावा तसेच आधार कार्डची झेरॉक्स आणावी. कापूस खरेदीच्या ठिकाणी येताना शेतकऱ्यांनी ‘मास्क’ किंवा तोंडावर रुमाल वापरणे बंधनकारक असून ‘फिजीकल डिस्टन्सिंग’चे पालन करणे सर्वांनी गरजेचे असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon cotton kharedi center open monday ragistetion