धुळे रस्त्यावर चार महिन्यांत २० जणांना बळी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

चाळीसगाव ते धुळे रस्त्यावरून वाहन चालविणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. या रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांची अक्षरशः वाट लागत आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव- धुळे राष्ट्रीय महामार्गाची सद्यःस्थितीत पूर्णपणे वाट लागली आहे. रस्त्यावर पडलेल्या लहानमोठ्या खड्डयांमुळेच अपघात होत आहेत. चार महिन्यांत सुमारे वीसपेक्षा अधिक बळी या रस्त्याने घेतले आहेत. सध्या राष्ट्रीय प्राधिकरण विभागातर्फे खड्डे बुजवण्याचे काम सुरू असले, तरी ते अतिशय संथ गतीने होत आहे. दरम्यान, या रस्त्यावरील मेहुणबारे गावाजवळील खड्डे तशीच असल्याने ही जीवघेणी खड्डे तातडीने बुजवून कामाची गती वाढवावी, अशी मागणी होत आहे. 
चाळीसगाव ते धुळे रस्त्यावरून वाहन चालविणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. या रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांची अक्षरशः वाट लागत आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसही आता बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील हॉटेल वर्षाजवळून सुरवात केली होती. या रस्त्याचे डागडुजी करण्याचे काम एक महिन्यांपासून सुरू असून, ते संथगतीने चालू आहे. चाळीसगावपर्यंत या रस्त्यावर वाहन चालवताना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी बिकट अवस्था या महामार्गाची झाली आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात रोजच अपघात होत आहेत. 

नक्‍की वाचा > सिलिंडरचे दर 695 रूपयांवर! 

कामाची गती वाढवावी 
चाळीसगाव- धुळे महामार्गाची दोन वर्षात अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. औरंगाबादकडून धुळे, सुरत किंवा इंदूरकडे जाण्याचा हा एकमेव मार्ग आहे. त्यात अवजड वाहनांचाही समावेश असतो. त्यामुळे या रस्त्याचे भरभक्कम काम करावे, अशी मागणी होत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये खडीकाम करून बुजवले जात असताना काही ठिकाणी आता ही खडी देखील निघत आहे. या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते. त्यामुळे या खड्ड्यांची परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ अशीच होणार की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या रस्त्याची केवळ थातूरमातूर खड्डे बुजवून मलमपट्टी केली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे काम भरभक्कम करावे व कामाची गती वाढवावी, अशी मागणी होत आहे. चाळीसगाव- धुळे महामार्गावर धुळेपासून ते ओढरे गावापर्यंत जवळपास ५२ किलोमीटरपर्यंत दुरुस्ती करण्यात येणार आहे. चाळीसगाव शहरातून हा रस्ता जात असल्याने त्याचेही काम होईल, अशी माहिती राष्ट्रीय प्राधिकरण विभागाकडून देण्यात आली. 

रस्‍त्यावरील खड्डे आम्ही सहन करत आहोत वाहनांचे नुकसान तेही सहन करत आहेत. या खड्यांनी नुसते लहान बालके नाही, तर कुणाची आई, कुणाचा, बाप, हिरावून घेतला आहे. यांच्या जीवनात पडलेले हे खड्डे प्रशासकीय सेवेकडून कधीच बुजू शकत नाही. यामुळे कमीतकमी रस्त्यावरील खड्डे, तरी बुजून लोकांचा संसार वाचविण्याचा सहयोग लाभेल व याचे सर्व श्रेय शासनकर्त्यांना मिळेल. 

ह. भ. प. विश्वनाथ महाराज वाडेकर 

चाळीसगाव- धुळे महामार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाला करणे शक्य होत नसेल, तर त्यांनी हा महामार्ग राज्य शासनाच्या बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात यावा. या रस्त्याचे सुरू असलेले दुरुस्तीचे काम गतीने करावे जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. 

प्रभाकर जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य 

खड्डे बुजविण्याचे काम चांगल्या प्रतीचे करावे. सुरू असलेले काम लवकरात लवकर करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्याची गरज आहे. या रस्त्यावरील गिरणा पुलाची दुरुस्ती लवकरात लवकर करावी जेणेकरून मोठा अपघात होणार नाही, अशी काळजी संबंधित विभागाने घेणे गरजेचे आहे. खड्डे टाळण्याच्या नांदात कमरे, पाठ व मानेचा विकार जडत आहे. या रस्त्याच्या खड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. 

सुनील बारवकर, मेहुणबारे (ता. चाळीसगाव ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon dhule highway four mounth 20 death