गिरणा’त ४१.५० टक्के पाणीसाठा...रब्बी हंगामात वाढ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 मे 2020

तीन हजार दशलक्ष घनफूट मृत साठा आहे. धरणातून ९ जानेवारीला पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. त्यानंतरची दोन आवर्तने सोडल्याने आता केवळ पिण्यासाठी एखादे आवर्तन सोडले जाऊ शकते. 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) :  तब्बल १३ वर्षांनंतर शंभर टक्के भरलेल्या गिरणा धरणात सद्यःस्थितीत ४१.५० टक्के साठा आहे. २०१९ मध्ये या महिन्यात हाच साठा अवघा १९.५६ टक्के होता. पावसाळ्यापर्यंत हा साठा पुरेसा असल्याने चिंता नाही. मात्र, तापमानात वाढ झाल्याने सिंचनासाठी पाण्याचा वापर वाढला आहे. ‘कोरोना’मुळे तालुक्यातील उद्योग- धंदे सध्या बंद असल्याने औद्योगिक क्षेत्रातील पाण्याचा वापर थांबला आहे. यंदा तालुक्यात कुठेही टँकर सुरू करावे लागलेले नाही. गिरणेच्या कृपेमुळे पाण्याची कमतरता नसल्याने रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असली तरी ‘लॉकडाउन’चा शेती व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. 

आर्वजून पहा :  आमदार झाले पालक...अन्‌ तहसिलदार, प्रांताधिकारांनी धरला अंतरपाठ ! 

जळगाव जिल्ह्यासाठी संजीवनी ठरलेल्या गिरणा धरणामुळे यंदा चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तसेच जळगाव तालुक्यात पिण्याची पाण्याची टंचाई जाणवली नाही. पावसाळा सुरू होण्यासाठी अद्याप एक महिना शिल्लक आहे. तोपर्यंत ४१.५० टक्के साठा पुरेसा ठरणार आहे. त्यामुळे पाणीसाठा समाधानकारक असला तरी पावसाळा लांबल्यास ताण पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या धरणात दहा हजार ६७६ दशलक्ष घनफूट साठा शिल्लक आहे. त्यापैकी तीन हजार दशलक्ष घनफूट मृत साठा आहे. धरणातून ९ जानेवारीला पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. त्यानंतरची दोन आवर्तने सोडल्याने आता केवळ पिण्यासाठी एखादे आवर्तन सोडले जाऊ शकते. 

लघू प्रकल्प कोरडेठाक 
मागील वर्षी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मन्याड मध्यम प्रकल्पासह १४ लघू प्रकल्पांपैकी ९ प्रकल्प शंभर टक्के भरले होते. मात्र, आजअखेर तालुक्यातील १४ प्रकल्पांपैकी केवळ कृष्णापुरी प्रकल्पातील पाणीसाठा ५० टक्यांपेक्षा अधिक म्हणजे ५३.९५ टक्के इतका आहे. तर उर्वरित चार प्रकल्पांमध्ये शून्य टक्के साठा आहे. नऊ प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणी आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात घट होत आहे. गिरणा पाठोपाठ मन्याड धरणातील साठाही ३०.५० टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे आणखीन दीड- दोन महिने पाणी पुरवण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे. 

क्‍लिक कराःजळगाव जिल्ह्यात कोरोनचाचा आलेख वाढताच...20 दिवसांत सव्वाशे पार 

उन्हाळी कपाशी लागवड वाढणार 
‘लॉकडाउन’मुळे शेतीला जबर फटका बसला असला तरी यंदा उन्हाळी कपाशी लागवड तालुक्यात वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा एकाही गावात पाण्याचे टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आलेली नाही. पाण्याचा स्रोत अद्यापही बऱ्यापैकी असल्याने पुढील महिन्यात कपाशी लागवडीसाठी शेतकरी आग्रही दिसून येत आहेत. त्यामुळे उन्हाळी कपाशीची लागवड वाढणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon girna dyam 41% water