esakal | लॉकडाऊन’मध्येही कर्मचाऱ्यांचे ‘अप-डाऊन’
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown covid

शासनाच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी बाहेरून ये जा करीत आहेत. आश्‍चर्य म्हणजे, ‘रेड झोन’ जाहीर केलेले जिल्हे व तालुक्यांमधूनही त्यांचे सर्रास ‘अप डाऊन’ सुरु आहे. त्यामुळे यापैकी एखाद्याला जरी कोरानाची लागण झाली तर भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

लॉकडाऊन’मध्येही कर्मचाऱ्यांचे ‘अप-डाऊन’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यातील जामडी येथील महिलेला कोरोनाची लागण झाल्याने निष्पन्न झाल्याने तालुक्यात एकीकडे कोरोनाची एन्ट्री झालेली आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी बाहेरून ये जा करीत आहेत. आश्‍चर्य म्हणजे, ‘रेड झोन’ जाहीर केलेले जिल्हे व तालुक्यांमधूनही त्यांचे सर्रास ‘अप डाऊन’ सुरु आहे. त्यामुळे यापैकी एखाद्याला जरी कोरानाची लागण झाली तर भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे ‘अप डाऊन’ करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्या या गंभीर परिस्थितीत येण्याजाण्याला पायबंद घालावा, अशी मागणी होत आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या तीनशेच्या वाटेवर आहे. चाळीसगावला तर चहूबाजूंनी कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. मालेगाव, पाचोरा, अमळनेर, भडगाव अशा सर्व सीमांवर कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे प्रशासनासह, पोलीस व आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असली तरी या यंत्रणेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना याचे गांभीर्य नसल्याचे त्यांच्या ‘अपडाऊन’वरुन दिसून येत आहे.

अपडाऊन थांबणार कधी
सद्यःस्थितीत कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून जाहीर केलेल्या जिल्ह्यांमधून अधिकारी व कर्मचारी चाळीसगावला अपडाऊन करीत आहेत. येथील आरोग्य विभागातील जबाबदार अधिकारी नुकतेच कोरोनाची लागण झालेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी गेले आहेत. ही बाब त्यांच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी त्यांना तंबी देऊन तिकडेच आठ दिवस थांबण्यास सांगितले आहे. प्रत्यक्षात यासारखे अनेक जण अजूनही सर्रासपणे अपडाऊन करीत आहेत. त्यांच्या येण्याजाण्यामुळे कोरानाची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वास्तविक, नियमानुसार या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीच्याच ठिकाणी राहणे आवश्‍यक आहे. त्यांच्या अपडाऊनमुळे निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेता, त्यांचे अपडाऊन थांबणार कधी? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

कृषी, आरोग्य विभागातील कर्मचारी अधिकारी
दररोज बाहेरगावहून अपडाऊन करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक कर्मचारी व अधिकारी कृषी व आरोग्य विभागातील आहेत. त्याखालोखाल बँकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या आहे. याशिवाय शासनाच्या इतरही विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दररोज बाहेरगावहून ‘अप डाऊन’ सुरु आहे. चाळीसगावचे तालुका कृषी अधिकारी धुळे येथून येतात. सध्या मात्र त्यांचे कार्यालयात येणे कमी झाले आहे. पावसाळा जवळ आल्याने या कार्यालयात कामाचे स्वरुप सध्या वाढलेले आहे. अशा परिस्थितीत त्यांनी चाळीसगावलाच थांबणे अपेक्षित असताना त्यांच्या धुळे अपडाऊनमुळे शेतकऱ्यांची गैरसोय तर होतेच आहे शिवाय कोरोनाचाही धोका वाढला आहे.

loading image