esakal | जामडीतील महिला कोरोना ‘पॉझिटिव्ह'; चाळीसगाव तालुक्यात खळबळ 
sakal

बोलून बातमी शोधा

corona positive

कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या शहरांच्या सीमेवर असलेल्या चाळीसगाव तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नव्हता. मात्र, आपल्या नातेवाइकाच्या अंत्ययात्रेसाठी भडगावला गेलेल्या जामडी (ता. चाळीसगाव) येथील महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.

जामडीतील महिला कोरोना ‘पॉझिटिव्ह'; चाळीसगाव तालुक्यात खळबळ 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : आतापर्यंत कोरोनापासून दूर असलेल्या चाळीसगाव तालुक्यात कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. जामडी (ता. चाळीसगाव) येथील महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे जामडी गाव प्रशासनाने ‘सील’ केले असून गावातील १६ जणांना चाळीसगाव येथील अंधशाळेत असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये क्वारटाइन करण्यात आले आहे. 
कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या शहरांच्या सीमेवर असलेल्या चाळीसगाव तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नव्हता. मात्र, आपल्या नातेवाइकाच्या अंत्ययात्रेसाठी भडगावला गेलेल्या जामडी (ता. चाळीसगाव) येथील महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. आठ दिवसांपूर्वी ही महिला भडगाव येथे नातेवाइकाच्या अंत्ययात्रेसाठी गेलेली होती. त्या ठिकाणी मृत व्यक्तीचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले असता, ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली होती. त्यानंतर ही महिला दोन तीन दिवस भडगावातच असल्याने त्यांचीही तपासणी करण्यात आली होती. सुरवातीला या महिलेचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती समजल्यानंतर काल (१७ मे) सायंकाळी ही महिला आपल्या गावी जामडीला आली. मात्र, लगेचच रात्री या महिलेचा अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आल्याची माहिती प्रशासनाला समजली. त्यानुसार, तहसीलदार अमोल मोरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. पी. बाविस्कर यांनी रात्रीच्या रात्री जामडीतील संबंधितांशी संपर्क साधला. या दरम्यान, संबंधित महिलेच्या कुटुंबाला देखील त्यांचा अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे रात्रीच्या रात्री ही महिला भडगावला रवाना झाली होती. त्यामुळे केवळ तीनच तास ही महिला जामडीतील आपल्या घरी होती. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून तहसीलदार अमोल मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. पी. बाविस्कर, ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे आदींनी गावात जाऊन पाहणी केली व ग्रामस्थांना योग्य त्या सूचना केल्या. 

१६ जण क्वारंटाइन 
दरम्यान, भडगाव येथून जामडी येथे आपल्या गावी आलेल्या महिलेच्या संपर्कात आलेल्या १६ जणांना चाळीसगाव शहरातील अंधशाळेतील कोविड केअर सेंटर येथे क्वारंटाइन केले आहे. या सर्वांचे स्वॅब घेण्यात आले असून ते तपासणीसाठी धुळे येथे पाठवल्याची माहिती डॉ. बी. पी. बाविस्कर यांनी दिली. त्यांचा अहवाल काय येतो, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. 

loading image