चाळीसगावला येणार सलमान खान, आदेश बांदेकर 

चाळीसगावला येणार सलमान खान, आदेश बांदेकर 

चाळीसगाव ः येथील भारतीय जनता पक्ष व युवा नेते मंगेशदादा चव्हाण मित्र परिवारातर्फे समाजहित लक्षात घेऊन शहीद जवान, शेतकरी, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून १ ऑगस्टपासून शहरातील सीताराम पहेलवान यांच्या मळ्याच्या जागेवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने चित्रपट अभिनेते सलमान खान व आदेश बांदेकर हे चाळीसगावला येणार असल्याची माहिती मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर आज सायंकाळी पत्रकार परिषदेत मंगेश चव्हाण यांनी सांगितले, की १ ते १४ ऑगस्ट या कालावधीत समाजातील विविध शाळांमधील सुमारे १० हजार गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप केले जाईल. ग्रामीण भागात एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापर्यंत मृतदेह सुरक्षित राहावा, यासाठीची सध्या कुठेही सोय नाही. ही बाब लक्षात घेऊन तालुक्यात विविध ठिकाणी ५० शवपेट्यांचे वाटप केले जाईल. आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांना श्रद्धांजली व त्यांच्या शौर्याचा गौरव व्हावा, यासाठी तसेच आपल्या देशाचे आपण काही तरी देणे लागतो, ही पवित्र भावना डोळ्यांसमोर ठेवून १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनानिमित्त रुपकुमार राठोड व सुनाली राठोड यांचा ‘एक शाम शहिदों के नाम’ हा देशभक्तिपर कार्यक्रम आयोजित केला आहे. १७ व १८ ऑगस्टला चाळीसगावच्या इतिहासात सुमारे २५ वर्षांनंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व शिवशंभू संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारीत व हजारो मावळ्यांच्या बलिदानातून व शौर्यातून निर्माण झालेले सुमारे तीन हजार कलाकारांचा सहभाग असलेले अतिविशाल ‘शिवसह्याद्री महानाट्य’ सलग दोन दिवस आयोजित करण्यात आले आहे. या महानाट्यासाठी समाजातील विविध सामाजिक संघटनांचे सहकार्य लाभले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला ‘भाऊजी’ म्हणून सुपरिचित असलेले ‘होम मिनीस्टर’फेम आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीत खास महिलांसाठी रक्षाबंधनासाठी मंगेश चव्हाण हे भावाच्या नात्याने बहिणींना पैठणींचे वाण देणार आहेत. 
२३ ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शहरासह तालुक्यातील भारतीय जनता पक्षातर्फे प्रत्येक प्रभाग, बुथवरुन सुमारे १५ हजार राख्या पाठवण्यात येणार आहेत. २४ ऑगस्टला अभिनेते सलमान खान यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठी दहिहंडी दहिहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शंभराहून गोविंदा मंडळांना आमंत्रित करून दहिहंडी फोडणाऱ्या मंडळाला आकर्षक बक्षीस तसेच सहभागी मंडळांना उत्तेजनार्थ बक्षिसे व स्मृतिचिन्ह दिली जाणार आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याने सुमारे ५०,००० नागरिकांची उपस्थिती राहील यादृष्टीने नियोजन केले आहे. 
२ ते १२ सप्टेंबर या काळात ‘चाळीसगावचा राजा’ हा गणेशोत्सव आयोजित करण्यात आला आहे. नऊ दिवस आगळेवेगळे कार्यक्रम होणार असून यानिमित्ताने ‘चाळीसगावचे ४० रत्नांचा’ गौरव करण्यात येईल. गणेशोत्सवात सामाजिक, अध्यात्मिक प्रबोधनाच्या दृष्टीने तालुक्यात ३० ठिकाणी प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवातही अशाच प्रकारचे विविध भव्यदिव्य कार्यक्रम राहणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या शहरासह तालुक्यातील व तालुक्याबाहेरील ज्या शाखांमध्ये १९५२ पासून ते आजपर्यंत ज्यांनी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात आपले नैपुण्य दाखवले व आज जे मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. अशा माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तालुक्यातील गोरगरीब, गरजू, असाह्य जनतेसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या महाआरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करून योग्य ते मोफत उपचार केले जातील अशी माहिती मंगेश चव्हाण यांनी दिली. पत्रकार परिषदेला नगरसेवक चंद्रकांत तायडे, माजी नगरसेवक सोमसिंग राजपूत, प्रभाकर चौधरी, कोदगावचे ग्रामपंचायत सदस्य भूषण पाटील, खुशाल पाटील, विशाल कारडा यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com