तो नरभक्षक पून्हा आला...अन्‌ पसरली दहशत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 February 2020

पुन्हा या भागातील दरेगाव रस्त्यावरील राजेंद्र भावसिंग कच्छवा यांच्या शेतात बिबट्याने वासरावर हल्ला करून फडशा पाडला.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव)  : दोन वर्षांपूर्वी सात जणांचा बळी घेणाऱ्या बिबट्याची दहशत अजूनही ग्रामस्थांच्या मनातून गेलेली नाही. ही भीती कायम असताना वरखेडे (ता. चाळीसगाव) शिवारात पुन्हा बिबट्या आढळून आल्याने भीती पसरली आहे. गेल्या पंधरा दिवसांत वासरांवर हल्ले केल्याच्या दोन घटना या भागात घडल्या होत्या. काल पुन्हा पिलखोड (ता. चाळीसगाव) येथे गोऱ्ह्याचा बिबट्याने फडशा पाडला. याच भागात दोन वर्षांपूर्वी बिबट्याने महिलेचा बळी घेतला होता. सध्या गुरांवर हल्ले करणाऱ्या या बिबट्याचा वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. 

वरखेडे (ता. चाळीसगाव) परिसरात दोन वर्षांपूर्वी नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घालून संपूर्ण जिल्ह्यातील यंत्रणा कामाला लावली होती. आता पुन्हा या भागातील दरेगाव रस्त्यावरील राजेंद्र भावसिंग कच्छवा यांच्या शेतात बिबट्याने वासरावर हल्ला करून फडशा पाडला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन वर्षांपूर्वी याच भागात तुकाराम जगताप यांच्या सूनबाईचा बिबट्याने बळी घेतला होता. याच भागात बिबट्या असल्याचे शेतकऱ्यांनी अनेकदा पाहिले आहे. असे असताना ज्या ठिकाणी कच्छवा यांच्या वासरावर हल्ला झाला, त्या ठिकाणी बिबट्याच्या पायांचे ठसे दाखवा, उलट प्रश्न वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना केला. प्रत्यक्षात ज्या ठिकाणी वासरावर हल्ला झाला, ती जागा कडक असल्याने बिबट्याच्या पायाचे ठसे कसे दिसतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हा हल्ला बिबट्याने केला असून हल्ल्यात ठार झालेले वासरू आता दिसत नसल्याने तिची आई दूध देत नसल्याने शेतकरी श्री. कच्छवा यांनी सांगितले. वन विभागाने त्यांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. 

क्‍लिक कराः  औरंगाबाद मार्गावरील एक "लेन' एप्रिलपर्यंत पूर्ण होणार
 

पंधरा दिवसांत तीन हल्ले 
वरखेडेसह जवळच्या पिलखोड परिसरात गेल्या पंधरा दिवसात बिबट्याने तीन हल्ले केले आहेत. वजेसिंग पाटील यांच्या शेतातील दोन वासरांचा फडशा हिंस्र प्राण्यांनी पाडला होता. मात्र, हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ही घटना ताजी असतानाच पिलखोड (ता. चाळीसगाव) येथे मुरलीधर बाविस्कर यांच्या शेतातील दोन वर्षाचा गोऱ्हा बिबट्याने फस्त केला. या तीन घटनांमुळे वरखेडेसह पिलखोड परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. नरभक्षक बिबट्याला ठार केल्यानंतर शेतकरी व शेतमजुरांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, पुन्हा बिबट्याचे दर्शन घडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. हा बिबट्या नरभक्षक होण्यापूर्वीच वन विभागाने पिंजरा ठेवून त्याला पकडावे, अशी मागणी होत आहे. 

क्‍लिक कराः सरकारी कर्मचाऱ्यांना उरले 205 दिवस काम 
 

बिबट्याला पोषक वातावरण 
मागीलवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे या भागात रब्बी क्षेत्राची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जास्त पावसामुळे यंदा शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे. वरखेडे शिवार बिबट्याच्या अधिवासासाठी सुरक्षित जागा असल्याने एक बिबट गेल्यावर दुसरा बिबट लगेच येतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. शिवाय ज्या भागात वासरांवर हल्ले झाले, तो भाग काही प्रमाणात जंगली असल्याने बिबट्याचे पुन्हा आगमन झाले असावे असाही अंदाज व्यक्त होत आहे. या बिबट्याला जेरबंद करून वन विभागाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

नक्की वाचा : बिल्डर'ने बांधकाम साइटवर केली आत्महत्या 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon varkhed villege sarundig Bibtaya terarr