यामुळे चाळीसगावातील अधिकाऱ्यांचे लॉकडाउनमधील अप-डाउन थांबणार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

वरिष्ठांनी दिलेल्या भेटीत कोणीही गैरहजर असल्याचे आढळून आल्यास किंवा याबाबत कोणाची तक्रार प्राप्त झाल्यास, संबंधिताची चौकशी करुन त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १८९७ अन्वये कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुख्यालयी थांबून सेवा द्यावी.
- डॉ. देवराम लांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी, चाळीसगाव

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यात एकीकडे कोरोनाची ‘एन्ट्री’ झालेली आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी बाहेरगावावरुन ये जा करीत आहेत. ‘रेड झोन’ असलेल्या जिल्ह्यांसह तालुक्यांमधूनही अनेकांचे ‘अप डाऊन’ सुरु आहे. या संदर्भात काल (१८ मे) ‘ई सकाळ’वर तसेच आजच्या ‘सकाळ’ वर्तमानपत्रात वस्तुनिष्ठ वृत्त झळकताच जिल्हा प्रशासनाने तसेच चाळीसगावचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे यांनी तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहून सेवा देण्याचे आदेश काढले. ‘सकाळ’च्या वृत्तामुळे आता अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ‘अप डाऊन’ थांबणार आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या तीनशेच्यावर गेली आहे. चाळीसगावच्या सीमेवरील मालेगाव, पाचोरा, अमळनेर, भडगावमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे प्रशासनासह पोलीस व आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असली तरी या यंत्रणेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना याचे गांभीर्य नसल्याचे त्यांच्या ‘अप डाऊन’वरुन दिसून येत आहे.
सद्यःस्थितीत कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ म्हणून जाहीर केलेल्या जिल्ह्यांमधूनही काही अधिकारी व कर्मचारी चाळीसगावला अप डाऊन करीत आहेत. आरोग्य विभागातील जबाबदार अधिकारी नुकतेच कोरोनाची लागण झालेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी गेले आहेत. तर तालुका कृषी अधिकाऱ्यांचेही धुळे येथून अप डाऊन सुरुच आहे. प्रत्यक्षात यासारखे अनेक जण अजूनही सर्रासपणे अपडाऊन करीत आहेत. या संदर्भात आजच्या ‘सकाळ’मध्ये चाळीसगाव पानावर ‘लॉकडाऊनमध्ये अपडाऊन सुरु’ या मथळ्याखाली वृत्त झळकले. ज्याची शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सकाळपासून एकच चर्चा होती. या वृत्तामुळे अनेकांचे धाबे दणाणले असून या वृत्ताची दखल घेत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे यांनी आजच तालुक्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयात थांबण्याचे आदेश काढले. या आदेशामुळे आता ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून रात्री अपरात्रीच्या सुमारासही रुग्णसेवेचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. असे असले तरी या आदेशाचे कितपत काटेकोरपणे पालन होते, हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘ई- सकाळ’ची दखल
कोरोना संसर्गाच्या आपत्कालीन परिस्थितीत बहुतांश शासकीय अधिकारी व कर्मचारी ये जा करीत असल्याचे वृत्त काल (१८ मे) दुपारी सव्वा चारच्या सुमारास ‘सकाळ’च्या डिजीटल आवृत्तीत झळकले. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी महसूल, कृषी, शिक्षण, आरोग्य यासह इतर विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहून सेवा देण्याचे आदेश काढले. अनेक जण मुख्यालयात राहत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही कार्यवाही केली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chlisgaon Officers will stop up-down in lockdown