शेतकऱ्यांनी जनावरांसमोर टाकली केळी! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

चोपडा : तालुक्‍यातील पूर्व आणि पश्‍चिम भागात नुकत्याच झालेल्या वादळाने केळीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी केळी अक्षरश: जनावरांसमोर टाकली असून, सुमारे नऊ कोटींचे नुकसान झाले आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. 

चोपडा : तालुक्‍यातील पूर्व आणि पश्‍चिम भागात नुकत्याच झालेल्या वादळाने केळीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी केळी अक्षरश: जनावरांसमोर टाकली असून, सुमारे नऊ कोटींचे नुकसान झाले आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. 
सातपुड्याच्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या चोपडा तालुक्‍यात काळ्या आईची इमान-इतबारे सेवा करून येथील शेतकरी रात्र-पहाट न बघता शेती करतो. त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मात्र, निसर्गाच्या अस्मानी फटक्‍याने "होत्याचे नव्हते' हा प्रकार दरवर्षी सुरूच असतो. तालुक्‍यातील पूर्व भागातील धानोरा, देवगाव, गोरगावले खुर्द, गोरगावले बुद्रुक, अडावद, तर पश्‍चिम भागात घोडगाव, कुसुंबा, वेळोदा, विटनेर, वढोदा या भागांत वादळी वाऱ्यासह पावसामुळे 797 हेक्‍टर क्षेत्रावरील केळी पिकाचे नुकसान झाले. यात 34 गावांत नुकसान जास्त प्रमाणात झाले असून, यात एक हजार शेतकऱ्यांचे सुमारे नऊ कोटींच्या नुकसानीचा अंदाज आहे. 
कापणीवर आलेली केळी वादळाने जमीनदोस्त झाल्यामुळे खाली पडून झाडे सडून गेली. डोळ्यांदेखत लाखो रुपयांचे नुकसान झाले. अखेर केळी जनावरांपुढे टाकावी लागली असल्याची माहिती शेतकऱ्यांना सांगताना अश्रू अनावर झाले. मात्र, निसर्गाच्या माऱ्यापुढे कुणाचे काहीएक चालत नाही. विज्ञान- तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असले, तरी अस्मानी संकटाच्या पुढे कुणालाच काही करता येत नाही. 

Web Title: marathi news chopda banana former