चोपड्यात बंडखोरीने समीकरणे बदलणार 

चोपड्यात बंडखोरीने समीकरणे बदलणार 

चोपडा विधानसभा मतदारसंघात माघारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह बसपा व अपक्षांची उमेदवारी कायम राहिल्याने निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. अपक्षांमुळे शिवसेना व राष्ट्रवादीपुढे पेच उभा राहण्याची चिन्हे आहेत. विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळेस "कमळ"हातात धरलेले माजी आमदार जगदीश वळवी यांनी यावेळेस घड्याळ बांधले आहे. शिवसेनेकडून विद्यमान आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लताबाई सोनवणे, याकूब साहेबू तडवी(बसपा), तर अपक्षांमध्ये डॉ. चंद्रकांत बारेला, जळगाव जि. प. चे समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या माधुरी पाटील यांच्यात लढत होणार आहे. भाजपकडून अखेर प्रभाकर सोनवणे, तर राष्ट्रवादीकडून माधुरी पाटील यांनी बंडखोरी करीत आपली उमेदवारी कायम ठेवल्याने चोपडा विधानसभा मतदारसंघाचे सर्व समीकरणे बदलणार आहेत. 
लोकसभेच्या निवडणुकीत भाजप- शिवसेनेची युती असताना शिवसेनेने प्रचार केला का? तेव्हा युती धर्म नव्हता का? मग आम्हीच का युती धर्म पाळावा? या मुद्यावर भाजपने उमेदवारी दाखल करून सेनेपुढे अडचण वाढविली आहे. विशेष म्हणजे माजी आमदार कैलास पाटील यांचे समर्थक उमेदवारी अर्ज दाखल करताना हजर असल्याने 
शिवसेनेचा उमेदवार असूनही शिवसेनेचा एक गट उघडपणे प्रभाकर सोनवणे यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येत आहे. याचा फटका कुणाला बसतो हा येणारा काळच ठरविणार आहे. दुसरीकडे आदिवासी युवक, वैद्यकीय सेवा देणारे डॉ. चंद्रकांत बारेला हे तिसऱ्यांदा उमेदवारी करीत नशीब अजमावीत आहेत. तालुक्यातील पूर्व भागात ३६ गावांमध्ये आदिवासीबांधव विखुरलेला आहे. त्यामुळे आदिवासींच्या मतांची विभागणी निश्चित असल्यानेही राष्ट्रवादीलाही कंबर कसावी लागणार आहे. तर शिवसेनेच्या उमेदवार लताबाई सोनवणे यांचे माहेर याच तालुक्यातील आहे. त्यामुळे कोळी समाजाचे एक गठ्ठा मतदान त्यांची जमा बाजू होती. मात्र, अपक्ष व भाजपतून बंडखोरी करीत असलेले जि. प. सभापती प्रभाकर सोनवणे हे सुध्दा कोळी समाजाचेच असल्याने त्यांचे नातेवाईक, गोतावळा या तालुक्यात विखुरलेला आहे. त्यामुळे मतदारसंघाची धुरा कुणाच्या हातात येईल हे येणारा काळच ठरविणार आहे. 
चोपडा विधानसभा मतदारसंघात मराठा व गुर्जर समाज बहुल आहे. हे दोन्ही समाज मतदारसंघात निर्णायक ठरतात. यावेळी माजी आमदार कैलास पाटील हे भाजपतून बंडखोरी केलेले जि. प. चे समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांचे समर्थक असल्याने त्यांच्याकडे मराठा समाजाची बाजू भक्कम आहे. पश्चिम भाग व तापीथडी भागातील बहुतेक गुर्जर समाज हा शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी केलेल्या व यावेळी अपक्ष उमेदवारी करीत असलेल्या माधुरी पाटील यांची नाराजीचा फटका ही राष्ट्रवादीला बसणार आहे. मागे किती मराठा व गुर्जर समाज शिल्लक राहतो? राष्ट्रवादीला कोणत्या समाजाची मते मिळणार? 
यामुळे राष्ट्रवादीला ही निवडणूक अडचणीची ठरण्याची चिन्हे दिसून येत आहेत. गतवेळेस कमळ हातात धरलेले आता घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवीत असल्याने चोपडा विधानसभा मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादीकडून बंडखोरी कायम असल्याने या निवडणुकीची समीकरणे बदलणार असून, राष्ट्रवादीपुढे अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 


बंडखोरी ठरणार डोकेदुखी 
चोपडा विधानसभा मतदारसंघासाठी माघारीच्या दिवशी अखेर भाजपने बंडखोरी करीत जळगाव जि. प. चे समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे यांची बंडखोरी कायम आहे. शेवटच्या दहा मिनिटात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माघारीसाठी विनंती केली. मात्र, विनंतीला धुडकवून प्रभाकर सोनवणे यांनी माघार न घेता उमेदवारी कायम ठेवली आहे. राष्ट्रवादीचे नेते अरुण गुजराथी यांना देखील गेल्या वेळेस राष्ट्रवादीकडून विधानसभेची उमेदवारी केलेल्या माधुरी पाटील यांचेही मन परिवर्तन करण्यात अपयश आले असून, भाजपप्रमाणे राष्ट्रवादीच्या माधुरी पाटील यांनी बंडखोरी केली असून दोघांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार आहे 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com