चौपदरीकरणाच्या कामात अडथळ्यांची शर्यत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

चौपदरीकरणाच्या कामात अडथळ्यांची शर्यत 

जळगाव : शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी खोदकाम सुरू झाले असून, दोन्ही बाजूंनी भरावासाठी लागणाऱ्या सुमारे दोन लाख ब्रास मुरमासाठी मेहरुण तलावातून उपसा करण्याची परवानगी मक्तेदारास मिळाली असताना आता तलाव पूर्ण भरल्याने हा मुरूम कोठून उपलब्ध करावा, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

चौपदरीकरणाच्या कामात अडथळ्यांची शर्यत 

जळगाव : शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी खोदकाम सुरू झाले असून, दोन्ही बाजूंनी भरावासाठी लागणाऱ्या सुमारे दोन लाख ब्रास मुरमासाठी मेहरुण तलावातून उपसा करण्याची परवानगी मक्तेदारास मिळाली असताना आता तलाव पूर्ण भरल्याने हा मुरूम कोठून उपलब्ध करावा, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

यंदा मराठवाडा वगळता महाराष्ट्रावर कृपा करणाऱ्या वरुणराजाने जळगाव जिल्ह्यावरही चांगलीच कृपादृष्टी ठेवली आहे. सप्टेंबर संपायला पंधरवडा शिल्लक असताना जळगाव जिल्ह्यात पावसाच्या सरासरीने शंभरी पार केली आहे. त्यामुळे अनेक प्रकल्पांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे. शहराचे वैभव असलेला मेहरुण तलावही गेल्या पाच-सहा वर्षांत प्रथमच पूर्ण भरला असून "ओव्हरफ्लो' झाला आहे. त्यामुळे जळगावकरांमध्ये सध्या समाधान व्यक्त होत आहे. 

चौपदरीकरण सुरू, पण.. 
मेहरुण तलाव भरल्याचा आनंद नागरिकांमध्ये असताना या तलाव भरण्याने महामार्ग चौपदरीकरणाच्या मक्तेदारापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मोठ्या प्रयत्न व आंदोलनातून हे काम मार्गी लागले, मात्र त्यातही अनेक अडचणी येत आहेत. खोटेनगर ते कालिंका माता चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण होत असून, त्यासाठी गुडगावच्या झेंडू इन्फ्रास्ट्रक्‍चरला मक्ता देण्यात आला आहे. या मक्तेदाराने काम संथगतीने का होईना सुरू केले असून, महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी खोदकाम करण्यात येत आहे. त्यासाठी काही जेसीबी, पोकलॅन्ड व डंपर कार्यरत आहेत. 

मुरूम कोठून मिळणार? 
या कामासाठी दोन्ही बाजूंना भराव टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुरूम लागणार आहे. जवळपास दीड ते दोन लाख ब्रास मुरूम या कामासाठी लागणार असल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी संबंधित मक्तेदाराने गौण खनिज विभागाकडे अर्ज करून मेहरुण तलावातून तसेच अन्य ठिकाणांहून मुरूम उपसण्याची परवानगी मिळवली होती. ज्यावेळी परवानगी मिळाली, त्यावेळी तलावात पाणीसाठा नव्हता. आता मात्र, चांगल्या पावसाने तलाव "ओव्हरफ्लो' झाला असून, या तलावातून मुरूम, गाळ कसा मिळेल? हा प्रश्‍न मक्तेदारासमोर उपस्थित झाला आहे. अन्य काही खदाणी, टेकड्यांवरुन मुरूम मिळवावा लागणार असून, त्यासाठी पुन्हा नव्याने परवानगी मिळविण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chupdikaran