मृत बाळाच्या दुःखातील प्रसूत मातेकडूनच साफसफाई,असंवेदनशिलतेचा कळस 

residentional photo
residentional photo

नाशिक : सरकारी कार्यालय, रुग्णालयात आपल्याला कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून अरेरावी, उद्धटपणे बोलणे हे नेहमीच ऐकायला मिळते, पण एखादी व्यक्ती किती खालच्या थराला जाऊन छळवणूक करू शकते, किती निर्दयी वागू शकते, याचे उदाहरण नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात शुक्रवारी (ता. 19) अनुभवायला, पाहायला मिळाले. रुग्णालयात दाखल महिलेची प्रसूती झाली, पण प्रसूतीनंतर बाळही दगावले. बाळ दगावल्याच्या दुःखात माता असताना एका निर्दयी महिला कर्मचाऱ्याने त्या बाळंतिणीलाच घाण फेकावयास लावत तिच्याकडून साफसफाई करून घेतली. या घटनेनंतर तिला जाब विचारण्यास गेलेल्या नातेवाइकांना अरेरावी केली. उद्धटपणे वागत "माझे कुणीच काही करू शकत नाही,' अशा आविर्भावात ती वावरत राहिली. असंवेदनशीलतेचा हा कळस शुक्रवारी (ता. 19) पाहायला मिळाला. 

नाशिकमधील राजू वाघमारे (रा. दत्तनगर, अंबड) यांनी त्यांची पत्नी शरयू यांना प्रसूतीसाठी गुरुवारी (ता. 18) जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. गर्भवती शरयू यांची प्रसूती विभागातील स्त्रीरोगतज्ज्ञांसह कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली नाही. सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांना प्रसूतीच्या वेदना (कळा) येऊ लागल्या, पण तरीही वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व मदतनीस कोणीच आले नाही. संबंधित महिलेची नणंद कामिनी संकर (रा. नाशिक रोड) यांनी परिचारिकांना बोलावलेही, पण त्या आल्याच नाहीत. अखेरीस शरयू या पलंगावरच प्रसूत झाल्या आणि मृत बाळाला जन्म दिला. 

बाळाचा मृत्यू, मातेचा आक्रोश 
अन्‌ साफसफाई, चक्कर 

बाळाच्या मृत्यूनंतर मातेने आक्रोश केला. त्याच वेळी मदतनीस कर्मचारी मीरा नंदू चिखले त्या ठिकाणी आली. तिने मृत बाळ नातलगांच्या हवाली करत अंत्यविधी करण्यास सांगितले. त्याप्रमाणे कामिनी संकर व नातलग मृत बाळाच्या अंत्यविधीसाठी निघून गेले. त्यानंतर बाळ दगावल्याच्या दुःखात असलेल्या शरयू पलंगावरच पडून असताना मदतनीस कर्मचारी मीरा नंदू चिखले तेथे आली. शरयू यांना उठवून पलंगावरील आणि खाली पडलेली घाण साफ करण्याचे फर्मान सोडले. त्या वेळी शरयू यांचा रक्तदाब वाढलेला होता. ही सफाई कर्मचाऱ्याने करणे अपेक्षित होते. मात्र, शरयू यांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करत साफसफाई करून घेतली. यामुळे शरयू यांना चक्कर आली आणि त्या कोसळल्या. त्यानंतर परिचारिका धावत आली आणि उपचार सुरू केले. 

नातलगांनी विचारला जाब 
बाळाच्या अंत्यविधीनंतर परतलेल्या कामिनी संकर यांना घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी जाब विचारला. त्या वेळी संबंधित परिचारिका व साफसफाई कर्मचाऱ्यांनी अरेरावी केली. शरयू यांची प्रकृती अजूनही अत्यवस्थ आहे. दरम्यान, प्रसूतीसाठी आलेली महिला सुखरूप बाळंत झाल्यास साफसफाई कर्मचाऱ्यांना महिलेच्या नातलगांकडून आर्थिक भेट (टीप) दिली जाते. या प्रकरणात मात्र तसे न घडल्यामुळे साफसफाई कर्मचारी मीरा चिखले हिने बाळंतिणीलाच साफसफाई करण्यास भाग पाडल्याची चर्चा रुग्णालयात आहे. 

गरीब आहे म्हणून कशीही वागणूक देणार का? पोर गेलं म्हणून ती आधीच दुःखात आहे. त्यात "मावशी'ने तिला साफसफाई करायला लावली. तिलाच काही झालं असतं तर तिच्या लेकरांनी कोणाकडे पाहिलं असते? डॉक्‍टर आले नाही की नर्सपण आल्या नाहीत. असे असते हे चांगले हॉस्पिटल? 
- कामिनी संकर, गर्भवतीची नणंद 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com