"सिव्हिल'मधील कैदी वॉर्ड वाऱ्यावर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

जळगाव : "सिव्हिल'चा कैदी वॉर्ड हा जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये अटकेत असलेल्या न्यायबंदीसाठी गुन्हेगारी कृत्याच्या बैठकांचा अड्डा बनत चालला आहे. गेल्या महिन्यात 29 सप्टेंबरला या वॉर्डात विश्रामासाठी आलेले कैदी आणि पोलिसांची व्हीआयपी ट्रीटमेंटचा प्रकार समोर आला होता. आता चक्क डॉक्‍टरांनाच ऍडमिट करवून घेण्यासाठी धमकावत दबाव आणल्याचा प्रकार समोर येत आहे. 

जळगाव : "सिव्हिल'चा कैदी वॉर्ड हा जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये अटकेत असलेल्या न्यायबंदीसाठी गुन्हेगारी कृत्याच्या बैठकांचा अड्डा बनत चालला आहे. गेल्या महिन्यात 29 सप्टेंबरला या वॉर्डात विश्रामासाठी आलेले कैदी आणि पोलिसांची व्हीआयपी ट्रीटमेंटचा प्रकार समोर आला होता. आता चक्क डॉक्‍टरांनाच ऍडमिट करवून घेण्यासाठी धमकावत दबाव आणल्याचा प्रकार समोर येत आहे. 

जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी दाखल आहे, आरोग्याची तक्रार असलेल्या कैद्यांना दर आठवड्याला जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणले जाते. काल (ता. 16) आजारपणाची तक्रार असलेल्यांपैकी संतोष अजाबराव पाटील, सचिन सुभाषसिंग जाधव, मिथुन मोहन बारसे, गजानन पोपट सपकाळे, आसिफ बेग असलम बेग यांच्यासह इतरांना तपासणी व औषधोपचारासाठी आणले. औषधोपचार करून काहींना परत कारागृहात रवाना करण्यात आले तर, ज्या कैद्यांनी पूर्वीपासूनच "सेटिंग' लावून ठेवलेली होती अशांना डॉक्‍टरांनी कैदी वॉर्डात उपचारासाठी दाखल करवून घेतले. तपासणी करून वॉर्डात पाठवल्याची चिठ्ठी दिल्यावर एक दोन कैद्यांनी डॉक्‍टरांना विचारणाही केली मात्र त्यांनी काहीएक सांगितले नाही. मात्र प्राप्त माहिती नुसार रुग्णालयात कैद्यांना आणण्यापूर्वीच एकाने जिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टरांशी वाद घातला. 

डॉक्‍टरांमध्ये भीतीचे वातावरण 
कैद्यांना ऍडमिट करवून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या नावांचा वापर केला जातो. डॉक्‍टरांनी तपासणीनंतर दाखल करण्यासारखे ठोस कारणच नसल्याचे सांगितल्यावर, त्या डॉक्‍टरला कैद्याकडून प्रलोभन नाही तर, धमकी देऊन गप्प बसवले जाते. 

वॉर्डात दिवाळीची तयारी 
अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे, कुटुंबीयांसह आपल्या साथीदारांची निवांत भेटीसाठी कैदीवॉर्ड एकमेव उत्तम जागा आहे. त्यामुळे काही जण "सिव्हिल'मध्ये दाखल होण्यासाठी आपल्या पद्धतीने सेटिंग लावलेली आहे. गेल्या चार महिन्यात भुसावळ येथील एक कैदी वारंवार दाखल होत असून दिवाळीतही त्याचा पहिलाच नंबर लागला, उर्वरित कैद्यांनीही दिवाळीत कोण केव्हा दाखल होणार याची पूर्व तयारी केली आहे. डॉक्‍टर, गार्डवर असलेले पोलिस आणि पाठवणारी कारागृहाची यंत्रणा अशी साखळीच तयार झाली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news civil word chor