कृषी, सिंचन, उद्योग हे आगामी विकासाचे केंद्रबिंदू : आमदार किशोर पाटील 

Kishor patil
Kishor patil

जळगाव : मतदारसंघात कृषी, सिंचन, उद्योग आणि शेतरस्ते विकासाचे केंद्रबिंदू असतील. आगामी पाच वर्षांत मतदारसंघात शाश्‍वत विकास करण्यात येईल, अशी ग्वाही पाचोरा विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे दुसऱ्यांदा यश मिळविलेले आमदार किशोर पाटील यांनी दिली. "सकाळ'शी दिलेल्या भेटीत चर्चा करताना त्यांनी आगामी मतदार संघातील विकासाचे व्हीजन मांडले. 

पाचोरा मतदारसंघातून दुसऱ्यांदा यश मिळविल्यानंतर आज त्यांनी जळगाव येथील औद्योगिक वसाहतीतील "सकाळ' कार्यालयास सदिच्छा भेट दिली. सहाय्यक वृत्तसंपादक अतुल तांदळीकर, मुख्य व्यवस्थापक संदीप त्रिपाठी (जाहिरात) यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. 
यावेळी बोलताना ते म्हणाले, की पाचोरा तालुक्‍यातील जनतेने आपल्याला दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत यश दिले आहे. त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. मोठ्या कठीण परिस्थितीत जनता आपल्या पाठीशी उभी राहिली, एवढेच नव्हे तर मोठ्या मताधिक्‍याने आपल्याला विजय मिळवून दिला, त्यामुळे हा आपला विजय नव्हे तर जनतेचाच विजय आहे. जनतेच्या या ऋणातून उतराई होणे शक्‍यच नाही. परंतु, आपण या जनतेच्या विकासासाठी प्रत्येक क्षण देणार आहोत. 

प्रश्‍न : विकासासाठी प्राधान्य कशाला देणार? 
आमदार किशोर पाटील : शेतरस्ते हा महत्त्वाचा प्रश्‍न आपण सोडविणार आहोत. जनआशीर्वाद यात्रेनिमित्त आपण तालुक्‍यातील सर्व गावात फिरलो त्या ठिकाणी आपल्याला शेतरस्त्याचे प्रश्‍न अधिक प्रकर्षाने जाणवले त्यामुळे आपण येत्या पाच वर्षात सर्व गावांमधील सर्व शेतरस्त्याचे प्रश्‍न सोडविणार आहोत. 

प्रश्‍न : युवकांसाठी विकासाचे व्हीजन काय? 
आमदार पाटील : युवकांना आज नोकरीसाठी, तंदुरुस्त राहण्यासाठी अभ्यासाची आवश्‍यकता असून स्पर्धा परीक्षेच्या सुविधा त्यांना गावातच हव्या आहेत. त्यामुळे आपण प्रत्येक गावात युवकांसाठी व्यायामशाळा व वाचनालय उभारण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. प्रत्येक तरुण आयएएस, आयपीएस होऊ शकत नाही. परंतु विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून त्याला किमान पोलिसदल, सैन्यात नोकरी लागली पाहिजे. त्यासाठी हा प्रयत्न असेल. वाचनालयात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके उपलब्धतेसह मार्गदर्शनाच्या सुविधाही उपलब्ध करून देणार आहोत. 

प्रश्‍न : सिंचनाच्या प्रश्‍नाबाबत काय सांगाल? 
आमदार पाटील : पाचोरा आणि भडगाव तालुक्‍यातील सिंचनाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी गिरणा धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याचे काम आपण प्राधान्याने करणार आहोत. तसेच बहुळा आणि उतावीळ नदीजोड प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू असून तो प्रश्‍नही या पाच वर्षांत मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. गिरणा नदीवर बलून बंधाऱ्यासाठी निधी मंजूर आहे. केंद्र शासनाकडून त्याला मंजुरी मिळवून लवकर ते उभारण्याचे काम सुरू करण्यात येईल. यामुळे पाचोरा भडगाव तालुक्‍यातील सिंचनाचा मोठा प्रश्‍न सुटणार आहे. याशिवाय वरखेड- लोंढे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. 

प्रश्‍न : पाचोऱ्यातील उद्योगाबाबतचे धोरण काय? 
आमदार पाटील : पाचोऱ्यात मोठे उद्योग यावेत यासाठी आपण येत्या काळात एमआयडीसी उभारणीसाठी प्रयत्नशील राहणार आहोत. त्यासाठी 87 हेक्‍टर जमीनही उपलब्ध आहेत. याशिवाय शेतकरीही जमिनी देण्यास तयार आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठे उद्योग आणून त्याचा विकास करण्यात येईल. या माध्यमातून युवकांना रोजगारही उपलब्ध होईल. याशिवाय सूतगिरणी उभारण्यासाठी आपला प्रयत्न असेल. तसेच शेतीवर आधारित उद्योग, आणि औषधी वनस्पतीच्या शेतीवर आधारित उद्योग आणण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. गेल्या काळात पाचोरा परिसरात रेल्वेचे डबे उत्पादनाचा अथवा देखभाल-दुरुस्तीचा मोठा प्रकल्प सुरू करण्यासाठी आपण भुसावळ डीआरएम व अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. परंतु, त्यासाठी आताच्या टर्ममध्ये पाठपुरावा करण्यात येईल. यापैकी एखादा प्रकल्प मतदारसंघात आणूच, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

प्रश्‍न : परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीबाबत काय सांगाल? 
आमदार पाटील : गेल्यावर्षी पाऊसच पडला नाही. कोरड्या दुष्काळात काहीतरी पीक शेतकऱ्याच्या हाती आले. पण, यंदा परतीच्या पावसाने खरिपाचा शंभर टक्के हंगाम पाण्यात वाहून गेला. शेतकऱ्यांचं कंबरडेच या पावसाने मोडले आहे. त्यामुळे 10 तारखेपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करण्यासंबंधी सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्या आधारावर जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. 

वाढदिवस साधेपणाने 
येत्या 1 नोव्हेंबरला किशोर पाटील यांचा वाढदिवस आहे. परंतु, यंदा मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात भीषण ओल्या दुष्काळाची स्थिती आहे. अशा स्थितीत वाढदिवस साजरा करणे उचित ठरणार नाही. त्यामुळे हा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

शेतमजुरांनाही मदत मिळावी 
कोरड्या अथवा ओल्या दुष्काळाने केवळ शेतकऱ्याचेच नुकसान होते, असे नाही. तर त्यात मोठ्या प्रमाणात शेतमजूरही भरडला जातो. किंबहुना शेतमजुरांची संख्या जास्त असल्याने त्यांना जास्त फटका बसतो. त्यामुळे दुष्काळी अनुदान, मदत देताना शेतमजुरांचाही विचार व्हावा, अशी मागणी आपण सरकारकडे लावून धरणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com