रस्तेविकासासह उद्योग उभारणीही राहणार अजेंड्यावर : उन्मेष पाटील 

unmesh patil
unmesh patil

जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा "रोड मॅप' तयार करून त्यानुसार काम करू, अशी ग्वाही उन्मेष पाटील यांनी दिली. 

"कॉफी विथ सकाळ' या उपक्रमांतर्गत त्यांनी मतदारसंघातील विविध विकासविषयक प्रश्‍नांवर दिलखुलास चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत तब्बल 4 लाख 10 हजारांच्या मताधिक्‍याने विजयी झालेल्या खासदार पाटील यांनी या विशेष संवादाच्या माध्यमातून आगामी पाच वर्षांत त्यांच्या मनातील विकासाचे व्हीजन व त्यातील टप्पे कसे गाठणार, याचे नियोजन मांडले. 

प्रश्‍न : लोकसभा निवडणुकीत विजयाची खात्री होती? 
उन्मेष पाटील : ऐनवेळी उमेदवारी मिळाली असली तरी मोदींच्या नेतृत्वावर व संघटनेच्या कर्तृत्वावर आपला विश्‍वास होता. उमेदवारी मिळाल्यानंतर थोडाच अवधी प्रचारासाठी मिळाला. मात्र, मजबूत संघटनेच्या बळावर आपण कमी दिवसांत अधिकाधिक लोकांपर्यंत पोचलो. 

प्रश्‍न : खासदार म्हणून कोणत्या कामांना असेल प्राधान्य? 
उन्मेष पाटील : आता केवळ चाळीसगाव नव्हे, तर त्यासारखे सहा मतदारसंघ कार्यक्षेत्र आहे. राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत, त्यांची व्याप्ती मोठी आहे. या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी कशी होईल, त्याकडे आपण लक्ष देऊ. सिंचनाच्या प्रकल्पासह रस्ते, रेल्वेशी संबंधित प्रश्‍न व विकासकामे, उद्योग उभारणी यावर भर देण्यात येईल. 

प्रश्‍न : खासदाराचे काम रेल्वेगाड्यांना थांबा मिळवण्यापुरते मर्यादित का ? 
उन्मेष पाटील : प्रयत्न करून रेल्वेगाड्यांना थांबा मिळविला, तरी तेथून पुरेसे प्रवासी मिळाले पाहिजे. त्यामुळे आपला भर आपली गावे, शहरं समृद्ध करण्यावर राहील. शेती, शेतकरी, नागरिक समृद्ध झाले तर गावे समृद्ध होतील. शहरांमध्ये उद्योग आले तर प्रवासी वाढतील, त्यामुळे रेल्वेला स्वतःच थांबा द्यावा लागेल. 

प्रश्‍न : रेल्वेशी संबंधित कोणती कामे करणार? 
उन्मेष पाटील : गेल्या पाच वर्षांत जळगाव- मनमाड तिसऱ्या रेल्वेलाइनचे काम सुरू झाले असून आहे. चाळीसगाव- धुळे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या काळात धुळे- मुंबई व धुळे- पुणे (व्हाया चाळीसगाव) या रेल्वे गाड्या, तसेच अप- डाउन करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या सोईसाठी भुसावळ- मुंबई स्वतंत्र रेल्वेगाडी सुरू करण्यासाठी आपण पाठपुरावा करू. पाचोरा- जामनेर पीजी रेल्वे ब्रॉडगेज करून ती अजिंठ्यापर्यंत नेता येईल का, त्यासंबंधी विचार करून तसे नियोजन केले जाईल. 

प्रश्‍न : रोजगार निर्मितीसाठी कोणता "प्लॅन' आहे ? 
उन्मेष पाटील : जळगाव एमआयडीसीची अवस्था बिकट आहे. चाळीसगावात आम्ही गेल्या पाच वर्षांत तीन हजार कोटींच्या गुंतवणुकीचे उद्योग आणले. त्याच धर्तीवर जळगावात उद्योग कसे येतील, त्यावर काम सुरू केले आहे. आठवडाभरात जळगावातील उद्योजकांच्या समस्या जाणून घेणार आहे. उद्योगांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या, दळणवळण असले, तर उद्योग विकसित होतात. त्यासाठी विमानसेवा सुरू करण्यापासून नव्या उद्योगांना चालना देण्यासाठी प्रोत्साहनपर योजनाही सुरू करण्याबाबत पाठपुरावा करू. शिवाय, पंतप्रधानांच्या कौशल्य विकास योजनेंतर्गत तरुणांना प्रशिक्षित करणे, क्‍लस्टर विकसित करून उद्योग उभारणे, यावरही भर देण्यात येणार आहे. 
 
चौपदरीकरणाचे कार्यादेश आठवडाभरात 
जळगाव शहरातील महामार्ग चौपदरीकरण व समांतर रस्त्यांचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासंबंधी बोलताना खासदार म्हणाले, यातील चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. निविदा मंजूर करून, कार्यादेश आठवडाभरात देण्यात येतील. हे काम तातडीने कसे पूर्ण होईल, यासाठी व्यक्तिशः: लक्ष घालू. 
 
रस्त्यांची कामे "इपीसी' तत्त्वावर 
औरंगाबाद- जळगाव, फागणे- तरसोद ही चौपदरीकरणाची कामे "हायब्रीड ऍन्युइटी' तत्त्वावर देण्यात आली होती. दोघा काम करणाऱ्या मक्तेदार एजन्सीकडे निधीची कमतरता भासल्याने कामे थंडावली. परंतु, लवकरात लवकर ही कामे सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासह जळगाव- नांदगाव- चांदवड, धुळे- चाळीसगाव या मार्गांचे कामही तातडीने होण्यासाठी "इपीसी' तत्त्वावर करण्यात येतील. याअंतर्गत शासनाकडून शंभर टक्के निधी या कामांसाठी मिळू शकणार आहे, असेही उन्मेष पाटील म्हणाले. 
 
नाथाभाऊंनीही दिल्या शुभेच्छा 
राजकीय विषयासंबंधी प्रश्‍नावर खासदार पाटील म्हणाले, मी लोकसभेत गेलो तरी अद्याप चाळीसगाव विधानसभेसाठी उमेदवाराची चाचपणी सुरू झालेली नाही. पक्ष सांगेल तो उमेदवार असेल, त्याला निवडून आणायची जबाबदारी मी स्वीकारली. परंतु, अद्याप कोणत्याही नावाची चर्चा नाही. आमदार झाल्यानंतर आपण पक्षातील नेते खडसेंशी संवाद साधलेला नाही, याबद्दल विचारले असता ते म्हणाले, नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत. नुकतीच आमची रेल्वेस्थानकावर भेट झाली, तेव्हा त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. मतदानाआधीही माझे त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com