प्राचीन काळातील नाणी, शिलालेखातून वृक्षसंवर्धनाचा संदेश 

residenational photo
residenational photo

नाशिक ः प्राचीन काळातही वृक्षसंवर्धन किती महत्त्वाचे होते, याची प्रचीती देणारी सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीची नाणी नाशिकचे नाणे संग्राहक चेतन राजापूरकर यांनी जमा केली आहेत. त्या काळातही वेगवेगळ्या माध्यमातून वृक्षाविषयी जनजागृती करण्यावर भर दिला जात होता. या नाण्यांवरचे वृक्षाचे चित्र सर्वांचे लक्ष वेधत आहे. 
सातवाहनकालीन प्रत्येक नाणे हे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचे काम करत असल्याचे राजापूरकर सांगतात. विशेष म्हणजे नाशिकमधील जुन्या सातवाहन नाण्यांमध्ये प्रत्येक नाण्यावर एक वृक्ष दाखविण्यात आला आहे. त्यातून त्यांनी नाशिकच्या वृक्षांविषयी संदेश देण्याचे काम केले आहे. त्यांच्याकडे अशी हजार दुर्मिळ नाणी असून, प्रत्येक नाण्यावरील नदी, पक्षी, प्राणी, वृक्ष बघावयास मिळतात.

सातवाहन काळात पर्यावरणाविषयी जनजागृतीही त्यांच्या नाण्यांवर सहज दिसून येते. लोकांना झाडांचे महत्त्व समजावे, यासाठी नाण्यांवर पर्यावरणाच्या विविध चिन्हांचा वापर केलेला दिसून येतो. नाशिक येथील पांडवलेणी क्रमांक 10 मध्येसुद्धा राजा नहपान याने ब्राह्मणास पाच हजार झाडे दान केल्याचा उल्लेख आढळून येतो.

जुन्नरमध्ये मानमोडी डोंगरावर अंबा-अंबिका लेण्यातील 26 क्रमांकाचे चैत्यगृहात चैत्य गवाक्षाच्या डाव्या बाजूला दोन शिलालेख वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगणारे आहेत. ताड, साल, वड, पिंपळ, करंज, जांभूळ अशी देशी झाडे लावावीत, असे सांगून ती लावण्यासाठी जमिनी दान दिल्या आहेत. दोन हजार वर्षांपूर्वी वृक्ष ंवर्धनाचे महत्त्व किती होते, हे त्या काळातील नाण्यांवरून कळते. आज आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करताना वृक्षांचे महत्त्व समजावून घेऊन प्रत्येकाने एक देशी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करायला हवे असे वाटते. 

गेल्या वीस वर्षांपासून मी नाणे संग्रह करीत आहे. चक्क दोन हजार वर्षांपूर्वीच्या प्रत्येक सातवाहन नाण्यांवर पर्यावरण संदेश देण्याचे काम केल्याचे मला दिसून आले आहे. नाशिकच्या पांडवलेणीच्या गुफांमध्ये असे संदेश आढळून येतात. या नाण्यांकडे बघितल्यावर वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजून येते. 
-चेतन राजापूरकर, नाणे संग्राहक, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com