पंजाब मधून आले आणि ८ गावठी कट्टे खरेदी केले ? पण पुढे असे घडले

सचिन पाटील 
Tuesday, 22 December 2020

पंजाब राज्यातील काहीजण शस्त्र खरेदी करून परतण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सहायक निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली.

शिरपूर  : पंजाब राज्यातून शस्त्र खरेदीसाठी महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर आलेल्या तिघांना सांगवी पोलिसांनी मंगळवारी पहाटे ताब्यात घेतले. संशयितांकडून आठ पिस्तुले, सहा जिवंत काडतुसांसह सव्वापाच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

आवश्य वाचा- स्वस्तात वस्तूचा फंडा, अन् ५१ लाखांचा गंडा -
नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी धुळे येथे या कारवाईबाबत माहिती दिली. पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत, अप्पर अधीक्षक डॉ.राजू भुजबळ, शिरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, सांगवीचे सहायक निरीक्षक अभिषेक पाटील उपस्थित होते.

अवैध शस्त्रांचा मिळाली गुप्त माहिती 

श्री दिघावकर यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध शस्त्रांच्या व्यापाराविरोधात धडक मोहीम सुरू आहे. त्या अनुषंगाने सांगवी पोलिस ठाण्यातर्फे खबऱ्यांचे जाळे कार्यान्वित केले आहे. त्यांच्यामार्फत पंजाब राज्यातील काहीजण शस्त्र खरेदी करून परतण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सहायक निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली होती.

आवर्जून वाचा- रात्रीचा कट्टाही लागला रंगू; शेकोटीवर म्हणे 'सासू' आण

पोलिसांनी असा रचला सापळा

मंगळवारी पहाटे साडेतीनला सीमावर्ती भागातील वरला-सांगवी रस्त्यावर जोयदा (ता.शिरपूर) शिवारात पोलिसांनी संशयावरून मारुती स्विफ्ट कार (पीबी 23 एफ 4564) ला थांबवले. त्यातील प्रवाशांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी झडती घेतली. तिघांजवळ एकूण आठ देशी बनावटीची पिस्तुले (कट्टा) व सहा जिवंत काडतुसे आढळली. अवैध शस्त्र खरेदी करून बाळगल्याच्या संशयावरून तिघांना ताब्यात घेण्यात आले.

साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

त्यांच्याकडून पिस्तुल, काडतुसे, तीन मोबाईल, 15 हजारांची रोकड व कार असा पाच लाख 32 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत, डीवायएसपी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार, हवालदार राजू सोनवणे, संभाजी वळवी, चतरसिंह खसावद, संजीव जाधव, पवन गवळी, इसरार फारुकी यांनी ही कारवाई केली. 

वाचा- ग्रामपंचायती निवडणूकीसाठी काँग्रेस जोमात -
 

स्वसंरक्षणासाठी पिस्तुल खरेदी

संशयितांमध्ये सुखविंदरसिंह प्रकाशसिंह शीख (वय 21, रा.बुलेरियन ता.मलोट जि.मुखसर), लवदीपसिंह दलजीतसिंह जाट (वय 23, रा.कोईटशिका ता.धरमकोट जि.मोगा), दरजनसिंह बलविंदरसिंह जाट (वय 30, रा.गुरुतेगबहादूर नगर जि.फरीदकोट) यांचा समावेश आहे. स्वसंरक्षणासाठी उमरठी (ता.वरला जि.बडवानी) येथून पिस्तुले खरेदी केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पिस्तूल घेऊन पंजाबकडे परत जात असतांना ते सांगवी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news crime dhule shirpur police arrest panjab gun buyers