बोगस बियाणे विक्रीवर नजर; पाच भरारी पथक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

कृषी विभागातर्फे आगामी खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना वेळेवर व मुबलक प्रमाणात बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके मिळावीत, यासाठी काटेकोर नियोजन केले जात आहे.

देऊर (धुळे) : खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खते, कीटकनाशके उपलब्ध होण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. या तयारीचाच एक भाग म्हणुन बोगस बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी विभागाने पाच भरारी पथकांची स्थापना केली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिली.

क्‍लिक करा - "ऍप'द्वारे घरबसल्या होऊ शकतात उपचार...कसे ते वाचा  

कृषी विभागातर्फे आगामी खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना वेळेवर व मुबलक प्रमाणात बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके मिळावीत, यासाठी काटेकोर नियोजन केले जात आहे. तसेच या कृषी निविष्ठांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी तालुकास्तरावर चार व जिल्हास्तरावर एक अशा पाच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळेल व अनधिकृतरीत्या विक्री होणाऱ्या बियाणे व खतांच्या विक्रीलाही लगाम बसणार आहे. शेतकऱ्यांनीही आपली फसवणूक होऊ नये म्हणून गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे, खतांची खरेदी करावी, त्या सर्वांची पक्की पावती, खरेदी केलेल्या बियाणे पाकिटाचे टॅग व लॉट क्रमांक पडताळून घ्यावेत. पेरणी झाल्यानंतर संबंधित बियाणे पाकिटे जपून ठेवावे, कीटकनाशके, तणनाशके खरेदी करताना त्यांची अंतिम मुदत तपासून घ्यावी, वाहनांतून खत विक्री करणाऱ्या फ्लाय सेलर्सकडून खतांची खरेदी करू नये, असे फ्लाय सेलर्स कुठे आढळल्यास तत्काळ 02562-234580 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, कुणीही विक्रेता जास्त दराने, झिरो बिल पावतीवर खतांची विक्री करत असेल तर त्याबाबत लेखी तक्रार जिल्हा कृषी कार्यालय अथवा तालुका कृषी कार्यालयाकडे करावी, असे आवाहनही श्री. सोनवणे यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news devur dhule agricalture department watch froad seeds pocket