esakal |  गुणवत्तापूर्ण’मध्ये धुळे जिल्ह्यातील सोळा शाळांचा समावेश  ​
sakal

बोलून बातमी शोधा

 गुणवत्तापूर्ण’मध्ये धुळे जिल्ह्यातील सोळा शाळांचा समावेश   ​

पुढील एक वर्षाच्या कालावधीत मिशन शंभर आदर्श शाळांतर्गत या शाळांमध्ये भौतिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उपक्रम सुरू करण्यात येत आहेत.

 गुणवत्तापूर्ण’मध्ये धुळे जिल्ह्यातील सोळा शाळांचा समावेश  ​

sakal_logo
By
तुषार देवरे

देऊर : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाचे ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ)अंतर्गत राज्यातील शंभर आदर्श शाळांच्या निवडीसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील सोळा शाळा सहभागी झाल्या आहेत. पैकी निकषात कमाल तीन, किमान दोन आदर्श शाळा जिल्हास्तरावर निवडणार आहेत. या शाळांना भेटी देऊन आराखडा तयार करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने शिक्षण विभागाला नुकतेच दिले आहे. 

आवर्जून वाचा- मतदान होवू नये यासाठी नवनिर्वाचित सदस्याचे अपहरण; आणि सिनेस्टाईल केली सुटका 
 

पुढील एक वर्षाच्या कालावधीत मिशन शंभर आदर्श शाळांतर्गत या शाळांमध्ये भौतिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानाची राज्यस्तर ते शासनस्तरावर प्रत्यक्ष नियोजन अंमलबजावणी व मूल्यमापन विविध उपक्रमांची अंमलबजावणी २६ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ अखेर होत आहे. २६ जानेवारी २०२२ ला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आदर्श शाळा पुरस्कार वितरण समारंभ होईल. यात उत्कृष्ट काम करणाऱ्या भागधारकांना सन्मानित करण्यात येईल. ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट गावातील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा या अभियानात सहभागी आहेत. 

आदर्श शाळेसाठी पटसंख्या शंभरच्या पुढे असणे आवश्यक आहे. आदिवासी भागात ६० पटसंख्या निकष ठेवला आहे. सहभागी शाळेची इमारत निर्लेखन झालेली नसावी. शाळेला स्वतःची जागा असावी. आदर्श शाळा निर्मितीसाठी लोकसहभाग हवा. श्रमदान अपेक्षित आहे. गावात विविध योजनेतून मिळालेले पुरस्कार, शिक्षकांना पुरस्कार, उपक्रमशील शाळेची निवड होईल. व्हीएसटीएफमार्फत प्राप्त निधीचा विनियोग पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी लोकसहभाग आधारित उपक्रम घेणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शाळांचा भौतिक कायापालट, शाळा समितीचे बळकटीकरण व शाळामध्ये आनंददायी शिक्षण होण्यासाठी कार्यक्रम सुंदरपणे राबविण्यात येतील. अद्ययावत सुविधा, पर्यावरणस्नेही वातावरण निर्माण होण्यासाठी परसबागेसह ‘एक मूल-एक झाड’ ही संकल्पना राबविली जाणार आहे. यासाठी सहभागी शाळेतील शिक्षक सरसावले आहेत. 

आवश्य वाचा- फागणे-तरसोद’च्या रखडलेल्या चौपदरीकरणासाठी गडकरींचा ‘अल्टिमेटम’  ​


सोळा गावांतील शाळा 
धुळे तालुका : खोरदड, नंदाळे बुद्रुक, लोणखेडी, रामचंद्र, बेंद्रेपाडा, कौठळ. साक्री तालुका : पांगण, धमनार, म्हसदी प्र. पिंपळनेर, चिंचखेडे, शेवाळी, पिंपळगाव खुर्द, काळंबा, उंभरे, उंभर्टी. शिरपूर तालुका : हेंद्रेपाडा.