धक्‍कदायक : ती वेदनांनी ओरडतेय तरी डॉक्‍टर पाहताय गंमत 

rural hospital
rural hospital

धरणगाव :  नऊ महिने पुर्ण झाल्यानंतर प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्या. महिलेला तात्काळ दवाखान्यात नेवून प्रसुती करण्याची वेळ आली होती. लॉकडाउनमुळे गावातून गाडी देखील मिळत नव्हती. अशात जेमतेम मिळालेल्या रूग्णवाहिकेतून महिलेला ग्रामीण रूग्णालयात प्रसुतीसाठी आणले. पण येथे आल्यानंतर डॉक्‍टराने आपले कर्तव्य विसरून प्रसुतीसाठी महिलेला दाखल करण्यास स्पष्ट नकार दिला. हा धक्‍कादायक प्रकार धरणगाव येथील ग्रामीण रूग्णालयात घडला. 
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलारबराव पाटील यांच्या मतदार संघ असलेल्या धरणगाव तालुक्‍यातील साळवा गावातील सदर महिलेबाबत हा प्रकार घडला. प्रसुती वेदनेने तळमळणाऱ्या गरोदर महिलेची प्रसूती करण्यास ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्‍टरांनी नकार देत चक्क आपल्या कॅबिनमध्ये स्वस्थ बसून राहिले. एकंदरीत माणुसकीला हरताळ फासल्याचा प्रकार येथील ग्रामीण रुग्णालयात घडला. 

डॉक्‍टर विसरले कर्तव्य 
साळवा शहरातील एका महिलेस प्रसववेदना सुरू झाल्या. परंतु तेथील वाहनाचे टायर खराब असल्याने तेथील आशा स्वयंसेविकेने धुडकी सोहन वासमुळे (बारेला) रा. साळवा या महिलेस धरणगाव येथील ग्रामीण रूग्णालयात आणले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश चौधरी यांनी महिलेस प्रत्यक्ष न तपासता जिल्हा रूग्णालात घेऊन जाण्याचा सल्ला देवून महिलेची प्रसूती करण्यास नकार दिला. अर्थात काही कामाचा ताण नसताना देखील डॉक्‍टरांनी प्रसुतीसाठी आलेल्या महिलेबाबत केलेला हा प्रकार धक्‍कादायक आहे. या साऱ्या प्रकारात सुमारे चार तासाच्या विलंब झाला. या काळात त्या महिलेस अथवा तिच्या पोटातील बाळास काही झाले असते तर याला जबाबदार कोण? हा प्रश्न निर्माण झाला असता? माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या डॉक्‍टरवर कर्तव्याचे पालन न केल्याने गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी होत आहे. 

आशा वर्कर स्वतः गेली पंक्‍चर काढायला 
प्रसुतीसाठी महिलेला जळगाव सिव्हीलमध्ये पाठविण्याचे डॉक्‍टराने सांगितल्यानंतर रूग्णवाहिका देण्याची आशा स्वयंसेविकेने मागणी केली. मात्र डॉ. चौधरी यांनी ड्रायव्हर हजर असताना देखील चालक नसल्याचे कारण देत वाहन देण्यास नकार दिला. दरम्यान महिला ही अक्षरश: वेदनेने तळमळत राहिली. हा प्रकार पाहून आशा वर्करने अखेर साळवा येथील पंक्‍चर झालेली रूग्णवाहिका कशी तरी धरणगाव येथे आणत मेकॅनिकला गाठून पंक्‍चर काढण्याचे काम केले. विशेष म्हणजे या आठवड्यातच रुग्णाची गैरसोय होऊ नये म्हणून शिवसेनेमार्फत ग्रामीण रुग्णालयाला रुग्णवाहिका देदेण्यात आली आहे मात्र त्यांनी ही रुग्णवाहिका देण्यास नकार दिला. 

अन्‌ दाखल केले खासगी रूग्णालयात 
सदरचा प्रकार नगराध्यक्ष निलेश चौधरी यांना माहित झाला. त्यांनी लगेच ग्रामीण रूग्णालयात धाव घेत डॉ. चौधरी यांना संबंधीत महिलेची प्रसूती करण्याची सुचना केली. तरी देखील डॉक्‍टरने याला साफ नकार दिला. यानंतर नगराध्यक्षांनी स्वत: अँब्युलन्स चालवतो असे सांगितले. तरीही डॉ. चौधरी यांनी कोणतीही तत्परता दाखविली नाही. यामुळे शेवटी नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी शहरातील डॉ. लिलाधर बोरसे यांच्याकडे महिलेची प्रसूतीसाठी स्वतः ऍम्बुलन्स चालवत दाखल केले. त्या महिलेच्या प्रसूतीच्या खर्च देण्याची तयारी दाखवली. मात्र डॉ. लीलाधर बोरसे यांनी खर्च घेण्यास नकार दिला. दरम्यान हे प्रकरण वाढू नये म्हणून ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका पाठवत त्या महिलेस रात्री उशिरा जळगाव सिव्हीलमध्ये रवाना करण्यात आले. 

ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांनी गरजू व गरीब महिलेस दिलेली वागणूक अतिशय निंदनीय आहे. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करून डॉक्‍टरवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करणार आहे. 
- निलेश चौधरी, नगराध्यक्ष, धरणगाव. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com