साक्री शहरातील पाणीप्रश्‍नी थेट मुख्यमंत्री ठाकरेंना साकडे !

निखील सुर्यवंशी
Friday, 11 December 2020

योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. मात्र, मध्यंतरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मोठ्या निधीच्या योजनांना स्थगिती देण्यात आल्याने मालनगाव पाणीयोजनेस अंतिम मंजुरी मिळू शकली नव्हती. 

साक्री : मालनगाव पाणीपुरवठा योजनेला लवकर अंतिम मंजुरी मिळाली, तर विकसनशील साक्री शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न सुटू शकेल. साक्रीकरांच्या हितासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम मंजुरीच्या निर्देशातून ही योजना मार्गी लावावी, असे साकडे येथील नगरपंचायतीचे गटनेते ज्ञानेश्‍वर नागरे यांनी घातले. त्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन योजनेची गरज व्यक्त केली. 

वाचा- मनपा करणार वर्षअखेर कचरा ठेकेदाराला ‘बाय-बाय' 

मुंबई येथील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी श्री. नागरे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. तसेच मागणीबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. साक्री शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्यादृष्टीने महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत नगरपंचायतीतर्फे मालनगाव येथून पाणीपुरवठा योजना साकारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात काही महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. ही योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. मात्र, मध्यंतरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मोठ्या निधीच्या योजनांना स्थगिती देण्यात आल्याने मालनगाव पाणीयोजनेस अंतिम मंजुरी मिळू शकली नव्हती. 
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.

वाचा- दवाखाने उद्या राहणार बंद; 'आयएमए'च्या संपात 'आयुष'चा सहभाग नाही

शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या या योजनेस तातडीने मंजुरी मिळवून काम सुरू करता यावे, यासाठी नगरपंचायतीचे गटनेते ज्ञानेश्वर नागरे, आमदार मंजुळा गावित, डॉ. तुळशीराम गावित, तालुक्याचे भूमिपुत्र तथा व्हिडिओकॉन कंपनीचे व्यवस्थापक हरीश मराठे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. त्यांना योजना मंजूर करण्यासाठी साक्रीच्या शिष्टमंडळाने साकडे घातले. तसेच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत श्री. नागरे व आमदारांनी योजनेसंदर्भात पाठपुरावा केला. मुख्यमंत्री ठाकरे व अन्य मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पाणीयोजना लवकर मंजूर करू, असे आश्वासन दिल्याचे श्री. नागरे यांनी सांगितले.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhle Statement on water issue directly to chief minister uddhav thackeray