न थांबता ५८० मीटर अंतर ३२ मिनिटांत पोहून पार 

भरत बागुल
Saturday, 5 December 2020

टीव्हीवर बीड जिल्ह्यातील ८० वर्षांच्या दिव्यांग वृद्धाने तरुणांना लाजवेल अशी बाइक चालवल्याचा व्हिडिओ बघितला. त्यातून मिळालेल्या ऊर्जेतून आपल्यालाही चांगलं पोहता येतं, त्यात काहीतरी नावीन्य करावं, असा निर्णय घेतला. 

पिंपळनेर (धुळे) : जिद्द, चिकाटी व प्रबळ इच्छाशक्ती, ध्येय डोळ्यासमोर ठेवून ४९ वर्षीय प्राथमिक शिक्षक कैलास बच्छाव यांनी येथील लाटीपाडा धरणात न थांबता ५८० मीटर अंतर अवघ्या ३२ मिनिटांत पोहून पार केले. 
बच्छाव चिंचदर (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असून, सध्या पिंपळनेर येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी पांझरा नदीवरील लाटीपाडा धरणात काही दिवसांपूर्वी पोहण्याचा सराव सुरू केला. सराव करतानाच शुक्रवारी तब्बल ५८० मीटर अंतर ३२ मिनिटांत पार केले. वीस वर्षांपूर्वी जेव्हा आपण पोहत होतो, त्या वेळी ६० ते ७० मीटर अंतर एका दमात पार करत असे. मात्र, पंधरा ते वीस वर्षांपासून पोहणे बंद होते. दरम्यान, कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात सुट्या होत्या. त्याचदरम्यान टीव्हीवर बीड जिल्ह्यातील ८० वर्षांच्या दिव्यांग वृद्धाने तरुणांना लाजवेल अशी बाइक चालवल्याचा व्हिडिओ बघितला. त्यातून मिळालेल्या ऊर्जेतून आपल्यालाही चांगलं पोहता येतं, त्यात काहीतरी नावीन्य करावं, असा निर्णय घेतला. 

लाटीपाडा धरणात रोज सराव
पोहणे उत्तम व्यायामही आहे म्हणून रोज लाटीपाडा धरणात पोहण्याचा सराव सुरू केला. ५० ते ६० मीटर अंतर रोज पोहत होतो. एके दिवशी धरणाच्या सांडव्याचे २९० मीटर अंतर पार केले. पुन्हा जिद्द, चिकाटीने परत येताना तेवढेच अंतर पोहण्याचे ठरवले. त्यानुसार हे ५८० मीटर अंतर अवघ्या ३२ मिनिटांत पार केले. दरम्यानच्या काळात मुलाचाही एकाच आठवड्यात पोहण्याचा सराव करून घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule 580 miter swiming no stop