धुळे जिल्हा "सेफ'... पण दोन जिल्ह्यांत 80 व्हेंटिलेटर; पुढे कस होणार...काळजीच.

निखिल सूर्यवंशी
बुधवार, 25 मार्च 2020

शिरपूर तालुक्‍यात सरासरी पावणेतीन हजार, तर उर्वरित जिल्ह्यात मिळून एकूण पावणेचार हजार व्यक्तींना "होम क्वारंटाईन'चा सल्ला देण्यात आला आहे. या स्थितीकडे "डिजिटल, "ई' सकाळ'च्या माध्यमातून लक्ष वेधल्यानंतर सरकारी यंत्रणेसह जाणकार हबकले आहेत. 

धुळे ः जगातील अनेक राष्ट्रांनंतर "कोरोना व्हायरस'ने भारतासह महाराष्ट्राला विळखा घालण्यास सुरवात केली. त्यामुळे व्यवसाय किंवा मुलामुलींमुळे अनेक स्थलांतरित कुटुंब, विद्यार्थी विदेशासह पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, गुजरातमधून धुळ्यात परतली आहेत. त्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीने जिल्हा "सेफ' वाटत असावा. त्यामुळे सरकारी यंत्रणेचा ताण मात्र वाढत आहे. एकीकडे ही स्थिती असताना धुळे व नंदुरबार जिल्हा मिळून केवळ 80 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. यावरून काय समजायचे ते नागरिकांनी समजून घ्यावे... 

"कोरोना' विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर अमेरिका, चीन, इटली, दुबईसह अनेक राष्ट्र, परप्रांत, परजिल्ह्यातून धुळे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 20 ते 22 हजार व्यक्ती "माहेरी' परतल्या आहेत. आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार एकट्या शिरपूर तालुक्‍यात सरासरी पावणेतीन हजार, तर उर्वरित जिल्ह्यात मिळून एकूण पावणेचार हजार व्यक्तींना "होम क्वारंटाईन'चा सल्ला देण्यात आला आहे. या स्थितीकडे "डिजिटल, "ई' सकाळ'च्या माध्यमातून लक्ष वेधल्यानंतर सरकारी यंत्रणेसह जाणकार हबकले आहेत. 

धाक नसलेले सरळ 
पावणेचार हजार व्यक्ती "होम क्वारंटाईन' असल्याच्या वृत्तामुळे त्याचा जिल्ह्यावर सकारात्मक परिणाम झाला. जे रिकामे, विनाकारण "आपल्याला काही होणार नाही', या भ्रमात हिंडत होते. त्यातील असंख्य घरातच राहणे पसंत करू लागले आहेत. त्यामुळे पोलिसांसह आरोग्य यंत्रणेचा देखदेखीचा ताण बुधवारी बऱ्यापैकी कमी झाला. धुळेकरांना स्थितीची जाणीव होणे आवश्‍यक होते. ही अधिकृत माहिती "सकाळ'ने समाजासमोर आणून धाक नसलेल्या धुळेकरांना सूतासारखे सरळ केल्याची प्रतिक्रिया काही अधिकाऱ्यांनी खासगी व्यक्त केली. 

सुदैवाने "सेफ', पण काळजी घ्या 
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना बाधित क्षेत्रातून येणाऱ्या व्यक्तींना जिल्हा प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यासह विविध उपाययोजनांची प्रामाणिकपणे आणि डोळ्यात तेल घालून अंमलबजावणी करावी लागेल. जिल्हा तूर्त "सेफ' वाटतो आहे. सुदैवाने धुळेकर आणि प्रशासनाला प्रयत्नांसह दैव साथ देत आहे. 
एखादा रुग्ण जरी चुकून कोरोनाग्रस्त आढळला तर आपले काही खरे नाही, धुळेकरांनी हा विषय "हसण्यावारी' घेऊ नये, घरात राहावे, दिलेल्या सूचनांचे पालन करावे. 

व्हेंटिलेटरची स्थिती जाणावी 
संसर्गजन्य कोरोनाग्रस्ताला व्हेंटिलेटरची आवश्‍यकता भासते. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात मिळून फक्त 80 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. ही गंभीर स्थिती लक्षात घेता संकट ओढवून घेण्यापेक्षा स्वतःची काळजी घेणे, सरकार व प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देणे गरजेचे आहे, असे जागतिक वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष तथा "आयएमए'चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule 80 ventilators in districts Dhule District "Safe"