माळमाथा परिसरातील टिटाणे येथे ढगफुटी!; आदिवासी वस्ती जलमय

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

गावातील गल्ल्यांसह रस्त्यावर पाण्याचा मोठा प्रवाह आल्याने सायंकाळी टिटाणेकडून खोरीकडे जाणारा एक दुचाकीस्वार दुचाकीसह वाहून जात असल्याचे निदर्शनास येताच गावकऱ्यांनी दोराच्या सहाय्याने संबंधितास वाचविले.

निजामपूर (धुळे)  : माळमाथा परिसरातील टिटाणे (ता.साक्री) येथे आज (ता.3) सायंकाळी झालेल्या ढगफुटीमुळे येथील आदिवासी वस्ती जलमय झाली असून घराघरात पाणी शिरलेय, अशी माहिती गटनेते, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भिकन बागुल यांनी दिली. आदिवासी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत मुसळधार पाऊस सुरू असल्याने शेतशिवारातही पाणी तुडुंब साचले होते. गावातील गल्ल्यांसह रस्त्यावर पाण्याचा मोठा प्रवाह आल्याने सायंकाळी टिटाणेकडून खोरीकडे जाणारा एक दुचाकीस्वार दुचाकीसह वाहून जात असल्याचे निदर्शनास येताच गावकऱ्यांनी दोराच्या सहाय्याने संबंधितास वाचविले. सुदैवाने संबंधित दुचाकीस्वार दुचाकीसह काटेरी झुडपांत अडकल्याने पुढील अनर्थ टळला. माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा गटनेते भिकन बागुल यांच्यासह गटनेते प्रवीण बागुल, सफदर पिंजारी, सरपंच नसरीन पिंजारी, उपसरपंच एकनाथ बहिरम आदींसह ग्रामस्थ परिस्थितीवर विशेष लक्ष ठेऊन आहेत!
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule aadivashi malmatha aria dhagfuti