धुळ्यात अभाविपच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज !

निखील सुर्यवंशी
Wednesday, 26 August 2020

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ स्टेबँकेसमोर पालकमंत्री सत्तार यांच्या वाहनांचा ताफा अडवून वाहनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.

धुळे : विविध शैक्षणिक प्रश्‍नांसंदर्भात भेट नाकारल्यानंतर पालकमंत्र्यांची कार अडविणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलक कार्यकर्त्यांवर धुळे शहरात बेदम लाठीचार्ज झाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अक्षरश: चोपून काढले. या घटनेमुळे नंतर पालकमंत्र्यांनी ढिसाळ बंदोबस्तामुळे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तर कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे या घटनेचा निषेध सुरू झाला. 

संसर्गजन्य कोरोनाचा फैलाव होत असताना विद्यार्थी आणि पालक आजही भयभीत आहेत. शैक्षणिक शुल्कात सवलत मिळावी, मंत्री उदय सामंत यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज (बुधवार) जिल्हा दौऱ्यावर असलेले पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची चर्चेसाठी भेट मागितली. ती नाकारण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ स्टेबँकेसमोर पालकमंत्री सत्तार यांच्या वाहनांचा ताफा अडवून वाहनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे पोलिसांची त्रेधा उडाली. कार्यकर्ते जोशात आंदोलन करीत असल्यामुळे ते हटण्यास तयार नव्हते. त्यामुळे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी बळाचा वापर करीत लाठीमार सुरू केला.

जिव्हारी आलेल्या पोलिसांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलक कार्यकर्त्याला बेदम चोपून काढले. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्याने आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू असताना प्रयोगशाळेच्या नावाखाली पाचशे रुपये शुल्क आकारणे, विद्यार्थ्यांचे प्रश्‍न जाणून न घेणे, तसेच कोरोनामुळे तीस टक्के शैक्षणिक शुल्क कमी करणे, सरासरीचा फॉर्मुला आणणारे मंत्री उदय सामंत यांचा राजीनामा राज्य सरकारने घेण्यासाठी आंदोलनाची धार राज्यात तीव्र केली जाईल, असे आंदोलक कार्यकर्त्यांनी सांगितले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule ABVP activists block Guardian Minister's vehicle for police charge batons